पर्यटक कोकणात राहण्यासाठी यावेत यासाठी प्रयत्न : अनिल परब

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी (२७ जानेवारी) ते बोलत होते. पारंपरिक खेळ्यांनी परिषदेचा प्रारंभ झाला. अंबर मंगल कार्यालयात झालेल्या या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर श्री. परब म्हणाले की, करोनामुळे वर्षभर आर्थिक संकटात गेले. आता काय करायला हवे, याचा विचार करायला हवा. पर्यटक रत्नागिरी जिल्ह्याकडे आकर्षित व्हावेत, या दृष्टीने धोरण ठरविणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन, बीच शॅक्स अशा छोट्या-छोट्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. यापुढे ही त्यात प्रगती केली जाईल. जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन व्यवसाय सर्वांत महत्त्वाचा असल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळातून सर्वाधिक निधी पर्यटनाकरिता देण्यात येणार आहे. पर्यटन व्यवसायातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न शासन नक्कीच करेल. पर्यटनवाढीच्या धोरणानुसार किमान सुविधा दिल्या तरी यशस्वी झालो, असे म्हणता येईल. पर्यटन सहजसुलभ झाले पाहिजे, यादृष्टीने पर्यटनाच्या क्षेत्रातील उद्योजकांकडूनही शासनाच्या काही अपेक्षा आहेत. गोव्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील सेवांचे दर महागडे असतील, तर त्याबाबतही विचार करायला हवा. पर्यटनाला आता उद्योगाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे व्यवसायाला नक्कीच चालना मिळेल. निवास आणि न्याहरी योजनेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा पाठवल्या. वास्तविक त्याचा काहीही संबंध नाही. अशा विविध त्रुटी, दोष आणि अडथळे दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे. व्यवसाय वाढवायची जबाबदारी उद्योजकांनी घ्यायला हवी, असे श्री. परब म्हणाले.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत या परिषदेत दुपारी सहभागी झाले. त्यांनी पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातच राहिला पाहिजे, तरच स्थानिकांना रोजगार मिळेल ,असे प्रतिपादन केले. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरीजवळ प्राणिसंग्रहालयाचा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी ५० कोटीचे नियोजन आहे. दुबईतील ग्लोबल व्हिलेजच्या धर्तीवर पाचशे एकर जागेत ग्लोबल इंडिया प्रकल्प उभारण्याची योजना आहे. देशात ज्या राज्यांमध्ये अधिक पर्यटनस्थळे आहेत, जेथे पर्यटकांचा ओढा असतो, त्यांची प्रतिकृती या प्रकल्पात उभारली जाणार आहे. विविध राज्यांमधल्या त्या पर्यटनस्थळावर जे पर्यटक जाऊ शकत नसतील, त्यांच्यासाठी त्या राज्यात जाऊन आल्यासारखे वाटावे, अशा स्वरूपाची योजना या प्रकल्पात राबविली जाईल. अशा नवनव्या संकल्पना राबविल्या, तर एकट्या गणपतीपुळ्यातच एका दिवसासाठी येऊन परत जाणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी जिल्ह्यात राहतील आणि त्यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल. स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी पर्यटक सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी आयोजित केलेल्या या परिषदेचे पर्यटनवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असल्याचे श्री. सामंत यांनी आवर्जून नमूद केले.

निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड यांनी वारसा पर्यटनाविषयी थोडक्यात माहिती दिली. एकूण पर्यटनापैकी ६० टक्के पर्यटन वारसा पर्यटन असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. मीनल ओक यांनी खाद्यसंस्कृतीचा आढावा घेतला. विकासाबरोबरच माणसाची विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र त्याचा मध्य म्हणजे शाश्वत विकास आहे. तो तसा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शाश्वत विकास या संकल्पनेचा उल्लेख इसवीसन पूर्व तिसर्याा शतकात कौटिल्याने केला होता. त्याचाच अवलंब आपण करायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोकणात ३७ प्रकारचे पर्यटन प्रकल्प होऊ शकतात, असे त्या म्हणाल्या. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पदार्थ पुरविले जायला हवेत. इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थांपेक्षा कोकणची खाद्यसंस्कृती जपण्याच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक आहे.

संगमेश्वरी बोलीचे अठराशेहून अधिक कार्यक्रम करणारे आनंद बोंद्रे यांनी कोकणातील कला संस्कृतीच्या माध्यमातून विविध ६२ प्रकारचे सादरीकरण करता येऊ शकते, असे सांगितले. या माध्यमातून रोजगारही वाढीला लागतील. तसेच विविध पारंपरिक कलांचे जतनही होईल. असे ते म्हणाले. एकट्या संगमेश्वर तालुक्यात पारंपरिक लोककला जपणारे २७३ मेळे आहेत. त्यांच्यासह सर्वच लोककलाकरांचे संघटन व्हावे, यासाठी पारंपरिक लोककला मंच स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यटन महामंडळाचे कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी अशा तऱ्हेच्या संघटनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

वीणा वर्ल्डचे सुधीर पाटील यांनी हॉटेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पर्यटन सफरी आयोजित करणाऱ्या संस्थांना काय अपेक्षित आहे, त्याचा आढावा घेतला.

श्रीवल्लभ साठे, ऋत्विज आपटे, डॉ. चंद्रशेखर निमकर यांनीही परिषदेत मार्गदर्शन केले.

यावेळी बबनराव पटवर्धन, सुनीलदत्त देसाई, वैभव सरदेसाई, सौ. नलावडे, प्रमोद केळकर, सचिन पाध्ये, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई इत्यादी पर्यटन व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी आमदार बाळ माने, कृषिपर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब दराडे, कंटूर ट्रॅव्हल्सचे अतुल मोहिते, मार्टचे उपाध्यक्ष श्री. चव्हाण सजागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संपादक डॉ. संतोष कामेरकर, चिपळूणच्या वाशिष्ठी पर्यटन संस्थेचे श्रीराम रेडीज, कौस्तुभ सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुधीर रिसबूड यांनी सूत्रसंचालन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply