डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैलीची ठाण्यात विनामूल्य सल्ला केंद्रे

ठाणे: ‘दीक्षित डाएट’ हा जीवनशैली बदलण्याचा मार्ग आहे, आपल्याला निरोगी, मधुमेहमुक्त आयुष्य जगायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर जीवनशैली बदलणे गरजेचे आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ आणि ‘दीक्षित डाएट’चे प्रणेते आडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ठाणेकरांना आज (३१ जानेवारी) दिला.

घंटाळी येथील सहयोग मंदिराच्या आयएमए हॉलमध्ये स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियानाअंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम आज राबविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याकडून प्रेरणा घेऊन मधुमेह आणि स्थूलत्वमुक्त विश्वाची संकल्पना सार्थ करण्यासाठी गेली सात वर्षे अविरत परिश्रम करणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या या अभियानाला आज ठाणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संपूर्ण जग करोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटाला सामोरे जात असताना करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करोना कालावधीत ठाणेकरांनीही प्रशासनाला आणि पोलिसांना अभूतपूर्व सहकार्य केले आहे. पोलिसांच्या आरोग्यासाठी डॉ. दीक्षित जीवनशैली योग्य आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

स्थूलत्व आणि मधुमेह या दोन समस्या आपले साम्राज्य दिवसेंदिवस पसरवत आहेत. या समस्या आता ज्येष्ठ नागरिकांपुरत्या मर्यादित न राहता तरुणांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. त्यांना थोपवण्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितलेली सोपी जीवनशैली ज्यांनी स्वीकारली, ते त्यातून मुक्त होत आहेत. आता ठाणेकरांपर्यंत ही जीवनशैली पोहोचविण्यासाठी ठाण्यात ही विनामूल्य केंद्रे सुरू होत आहेत. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

ठाण्यातील केंद्रांचा तपशील असा –

केंद्र क्र. १ – दर शनिवार सकाळी साडेसात ते साडेनऊ
सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, समतानगर, जेके ग्राम, मीरा’ज फिटनेस सेंटरजवळ, ठाणे (प.)

केंद्र क्र. २ – दर रविवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ
ब्रह्माळा तलाव, बाबूभाई पेट्रोल पंपाजवळ, एलबीएस मार्ग, ठाणे (प.)

कार्यक्रमात ठाण्यातील अडोर ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या मधुमेह मुक्ती केंद्राची सेवा ४ फेब्रुवारीपासून दर गुरुवारी सकाळी ८ पासून सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली. या केंद्रात समर्पित सेवा देणाऱ्या डॉ. राजपाठक आणि डॉ. सिद्दिकी यांचा डॉ. दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विलास काळे, विजय पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आयएमएचे अध्यक्ष डॉ.. संतोष कदम, नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक, डॉ. मधुरा कुलकर्णी आडोर ट्रस्टचे ट्रस्टी अरुण नावगे आणि रवी जगन्नाथन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले. अधिक माहितीसाठी त्यांच्या ९६१९५४६१२१ या मोबाइल नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply