तीन कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी : ‘हापूस अॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत रत्नागिरीतून हापूस आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघ प्रयत्न करणार आहे. मुंबईसारख्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या ३ कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे संघाचे प्रयत्न आहेत. त्याला आंबा बागायतदारांचाही प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

कॅनिंगसाठी आंबा विकताना तो ५० रुपये प्रतिकिलो या हमीभावाने विकावा. कॅनिंग फॅक्टरी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे नुकसान न करता हा हमीभाव दिला पाहिजे, याकरिता तालुका खरेदी-विक्री संघ समन्वय साधणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. संघाच्या दुसरी मासिक बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले.

श्री. माने यांनी सांगितले, थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रीकरिता शेतकऱ्यांना गतवर्षीप्रमाणे मदत करण्याचे धोरण तालुका खरेदी-विक्री संघाने आखले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या महापालिकांमध्ये सुमारे तीन कोटी जनता राहते. त्यांना थेट घरापर्यंत आंबा पोहोचला पाहिजे. गतवर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला होता. यंदासुद्धा करोनाच्या संकट काळात हेच करावे लागणार आहे.

सध्या कोकणात बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पीकविम्याचा लाभ झाला आहे का, या सर्व प्रक्रियेवर तालुका खरेदी-विक्री संघ लक्ष ठेवणार आहे. पीकविमा योजनेचे निकष, आंबा-काजू लागवड, भौगोलिक सलगता आणि हवामान बदल यानुसार विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याकरिता तालुका खरेदी-विक्री संघ शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यांनी खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले.

केंद्र सरकार पुरस्कृत भात खरेदी योजनेनुसार शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेऊन ते हमी भावाने विक्री केल्यास शेतकऱ्याला हातभार लागेल. याकरिता जनजागृती करण्याचे काम खरेदी-विक्री संघ करत आहे. त्यासाठी तालुका दौरा सुरू आहे. सोमेश्वर, खेडशी, दांडेआडोम, चांदेराई, नाणीज, हातखंबा, करबुडे, शिरगाव येथे १५ मार्चपर्यंत बैठका घेण्यात येणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply