रत्नागिरीत २२, सिंधुदुर्गात १३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० मार्च) करोनाचे नवे २२ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार १७१ झाली आहे. आज २१ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १३ बाधित रुग्ण आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २२ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी, खेड आणि गुहागर तालुक्यात प्रत्येकी २, दापोली आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १, तर चिपळूण तालुक्यात ८ बाधित रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि खेड तालुक्यात प्रत्येकी २, तर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून २२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार १७१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ८८५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८६ हजार १६९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १५२ आहे. त्यातील सर्वाधिक ४९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २१ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९६२३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. चिपळूण तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ३७० असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१० मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत १० आणि आजपर्यंत एकूण ६ हजार १९० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्ती बाधित झाल्याचा तपासणी अहवाल आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. आज १३ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६ हजार ५४० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७६ आहे. कणकवली तालुक्यातील जानवलीच्या रामेश्वरनगरातील घर क्र. ८८२ आणि परिसरात येत्या २२ मार्च पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply