रत्नागिरी : हातखंबा येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेत आगळावेगळा विवाह सोहळा झाला. संस्थेत चार वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मोहन गुरव आणि सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या सुप्रिया पाडळकर या निराधार जोडप्याचा अनोखा विवाह पार पडला आणि त्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली.
विवाहबद्ध झालेले दाम्पत्य संस्थेत येण्याच्या आधी समाजात एकटेच आणि रस्त्यावर तसेच बसस्थानकावर राहून उदरनिर्वाह करीत होते. मोहन गुरव (वय ५५) यांना नातेवाईक नसल्याने साखरपा येथून पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी माहेर संस्थेत दाखल केले होते. सुप्रिया पाडळकर (वय ५०) राजापूर एसटी बसस्थानकावर राहत असल्याचे समजताच राजापूरचे नगरसेवक श्री. खलफे आणि राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी माहेर संस्थेत दाखल केले होते. या दोघांच्या भावनांचा आदर करीत एकमेकांना पुढील आयुष्याचा आधार मिळवून देण्याचे काम माहेर संस्थेने केले.
या विवाह सोहळ्याच्या खर्चासाठी समाजातील दानशूर लोकांना आव्हान करण्यात आले होते. त्यामध्ये वधूसाठी लागणारे चांदीचे पैंजण श्रीमती पूजा सुर्वे, वधूची साडी श्रीमती मैथिली नरक, मेहंदी, शाली, पंचपाळ, चांदीची जोडवी, नथ श्रीमती प्राजक्ता पवार, वराचा ड्रेस, पंचा, नारळ, पेढे, हळद श्रीमती रिया सावंतदेसाई, लग्न सजावटीसाठी लागणारी गोंड्याची फुले, हार, गुच्छ सचिन शिंदे, आइस्क्रीम सौरव मलुष्टे, जेवणासाठी श्रीखंड विपुल सुर्वे, जेवणासाठी तीन हजार रुपये संदीप डोंगरेयांनी देणगी देऊन हातभार लावला.
विवाहासाठी माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सि. लूसी कुरियन, संस्थेचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, मंगेश पोळ, बाळू साकोरे, रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मीरा गायकवाड, शीतल हिवराळे, अमित चव्हाण, रामदास पाटील, शिल्पा डांगे, सीता मिश्रा, विजया कांबळे, नंदिनी पाटील, श्रद्धा चव्हाण, अमित येलवे, जोसेफ दास, आशीष मुळे, देणगीदार प्राजक्ता पवार, सचिन शिंदे, वैभव मुकादम, समर्थ नगरमधील चंद्रशेखर चव्हाण, संस्थेतील हातखंबा आणि खेडशीतील सर्व प्रवेशित मुले, मुली, महिला, पुरुष, परिसरातील हितचिंतक शुभेच्छुक उपस्थित होते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात या विवाहाने एकमेकांना आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची एक प्रकारे पहाटच झाली. त्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्याचा योग माहेर संस्थेमुळे आला. खऱ्या अर्थाने या जोडप्याची नवजीवनाची सुरुवात झाल्याची भावना लुसी कुरियन आणि सुनील कांबळे यांनी व्यक्त केली.
Follow Kokan Media on Social Media

