रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (६ जून) करोनाचे नवे ५६७ रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या अजूनही वाढतीच आहे. दरम्यान, राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील कडक निर्बंध ९ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३५३, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २१४ (दोन्ही मिळून ५६७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४० हजार २०० झाली आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ६३२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज दोन हजार ७२४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ४२८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ४२७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३४ हजार २१२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.१० टक्के आहे.
जिल्ह्यात आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ९, तर संगमेश्वर, दापोली, चिपळूण आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ३५६ झाली आहे. मृत्युदर ३.३७ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४०४, खेड १३३, गुहागर ९६, दापोली ११८, चिपळूण २६४, संगमेश्वर १६२, लांजा ६९, राजापूर ९८, मंडणगड १२. (एकूण १३५६).
……..
रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत कडक लॉकडाउन सुरूच
राज्य शासनाने उद्यापासून (७ जून) करोनाविषयक लॉकडाउनचे काही नियम शिथिल केले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ९ जूनपर्यंत कडक लॉकडाउन सुरूच राहणार आहे. आवश्यक असेल तेव्हा मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज स्पष्ट केले आहे.
राज्यात सुरू झालेल्या अनलॉक प्रक्रियेबद्दल रत्नागिरी जिल्ह्याबाबत कोणत्याही गोष्टीत गोंधळ होऊ नये, असे स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की, जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच मार्गदर्शक सूचनांनुसार आदेश दिले जातील. जिल्ह्यात गेल्या ३ जूनपासून ९ जूनपर्यंत कडक लॉकडाउन जारी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार ठरावीक वेळेत आणि निकषांनुसार अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. हेच नियम कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनलॉकच्या निकषांनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र जिल्ह्यातील करोनाची स्थिती लक्षात घेता आणखी तीन दिवस लॉकडाउन कायम राहणार आहेत. त्यानंतर प्रशासन चौथ्या टप्प्याच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
Follow Kokan Media on Social Media

