नागपूर-मडगाव रेल्वे नियमित सुरू ठेवण्याची नितीन गडकरींकडे मागणी

पेण (जि. रायगड) : विदर्भ आणि कोकणातील व्यावसायिक देवाणघेवाण आणि पर्यटनाच्या वाढीसाठी नागपूर-मडगाव रेल्वेगाडी नियमित करावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे दापोली-मंडणगड जनसंपर्क प्रमुख तसेच पेणचे तालुकाध्यक्ष हर्षद भगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवला आहे.

श्री. गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात श्री. भगत यांनी म्हटले आहे की, केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची, हापूस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदीचे लाडू, पेणचे पापड, कुरडई, पांढरा कांदा आयात आणि निर्यातीकरिता नागपूर-मडगाव मार्गावर सध्या कोविडच्या काळात आठवड्यातून एकदा धावणारी रेल्वेगाडी कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, इंदापूर, कोलाड, नागोठणे, पेण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. ती वेगाने विकसित होणारी शहरे आहेत. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्य कोकणात सर्वत्र सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठात नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या भरपूर आहे. नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव केळ्यांची मोठी बाजारपेठ येथून कोकणामध्ये केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची आदी उत्पादने येतात. रत्नागिरीतील हापूस आंबा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवगड हापूस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी खेळणी, पेणचे पापड, कुरडई, पांढरा कांदा विदर्भात विक्रीसाठी जातो. या दोन्ही बाजूंच्या आयात-निर्यातीकरिता नागपूर-मडगाव रेल्वे अत्यंत उपयुक्त आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर, अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मूर्तिजापूर येथील कार्तिकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्तगुरूचे स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शूर्पणखा मंदिर, धुळे येथील देवापूर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर पाहण्याकरिता अनेक भाविक त्या परिसरात जातात, तर कोकणातील निसर्गसौंदर्य पाहायला संपूर्ण महाराष्ट्र लोटत असतो.

अशा रीतीने धार्मिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यांची नाळ या एका गाडीममुळे जोडली जाते. त्यामुळे प्रवाशांची या गाडीसाठी प्रचंड प्रमाणात मागणी आहे. कोकणातून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना सध्या थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागतो. या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मडगाव ते नागपूर रेल्वेसेवा नियमित सुरू ठेवावी आणि या गाडीला पेण, चाळीसगाव, जळगाव, शेगाव, मूर्तिजापूर येथे अधिकृत थांबे मिळावे, अशी मागणी श्री. भगत यांनी सडक परिवहन, महामार्ग, रस्ते, वाहतूक, लहान, मध्यम, मोठे उद्योग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

(संपर्क – हर्षद भगत – 8796446566)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply