जाणिवेचा अनोखा सरित्सागर संगम

सिंधुसाहित्यसरितासाठी मधुसूदन नानिवडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने प्रसिद्ध केलेल्या आणि रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाची गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना.

……………………………..

‘सिंधुसाहित्यसरिता’ या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल सर्वप्रथम मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे आभार मानतो. अन्य एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे आणि या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची जबाबदारी मी आनंदाने आणि जबाबदारीने स्वीकारली आहे. माझ्यासाठी साहित्यिकांचे चरित्र ही आनंदाची बाब असल्याने मी या पुस्तकाची प्रस्तावना लिहायला लगेच तयार झालो.

कोकणची भूमी बौद्धिकदृष्ट्या अत्यंत सुपीक आहे. राज्यालाच नव्हे, तर देशाला आणि विश्वाला सर्व क्षेत्रांत मनुष्यबळ पुरवण्याचे काम कोकणाने केले आहे. साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, क्रीडा, संशोधन, विज्ञान, वैद्यकीय सेवा, प्रशासन अशा सर्व विषयांत कोकणच्या माणसाने आपली नाममुद्रा उमटवली आहे. कविश्रेष्ठ केशवसुत, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी आदी अनेकांनी लाल मातीची अक्षरपताका जगभरात फडकवली. याखेरीज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर, थोर साहित्यिक वि. स. खांडेकर, नाटककार जयवंत दळवी, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, विचारवंत ना. ग. गोरे, बॅरिस्टर नाथ पै, कविवर्य नारायण सुर्वे, श्री. मधु मंगेश कर्णिक यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.

अलीकडच्या शंभरेक वर्षांत अनेक लेखकांनी आपापल्या प्रतिभेने वाङ्मयात मोलाची भर घातली आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, कवी आरती प्रभू, डॉ. वसंत सावंत यांनी काव्यरसिकांच्या मनावर गारूड केले आहे. या जवळपास शंभर वर्षांच्या कालखंडात सिंधुदुर्गात साहित्य क्षेत्रात ज्यांचे फार मोठे योगदान आहे आणि ते स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहिले, त्यांच्यावरील लेखांचे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक वाचकांच्या नक्की पसंतीस उतरेल, याची मला खात्री आहे.

ललित लेखक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक साकारत आहे. एकूण एकवीस दिवंगत साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेणारे हे पुस्तक आहे. ज्या लेखकांनी हे परिचयात्मक लेख लिहिले आहेत, त्यातील बहुसंख्य लेखक अलीकडेच लिहू लागले आहेत; पण या सर्वांनाच एकत्र करून सुरेश ठाकूर यांनी त्यांना साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देणारे लेख लिहिण्याचे आवाहन केले आणि सर्वांनीच खूप चांगले लेखन केले आहे. या लेखांत डावे-उजवे ठरवणे खूपच कठीण आहे. कारण ह्या सर्वांनी अत्यंत श्रद्धेने लेखन केलेले आहे. त्यात जिव्हाळा आहे, आपलेपणा आहे.

दिवंगत कवी आ. सो. शेवरे यांच्यावर कवयित्री कल्पना मलये यांनी खूप सुंदर लेख लिहिला आहे. ‘झिरो बॅलन्स असलेले माझे पासबुक’ आणि ‘गांधारीची फुले’ हे आबा शेवरेंचे गाजलेले काव्यसंग्रह. कल्पना मलये यांनी खूप जिव्हाळ्याने त्यावर लेखन केले आहे. तसेच त्यांनी कवी डॉ. वसंत सावंत यांच्याविषयीही सुरेख लेख लेख लिहिला आहे. ‘इथे लाल मातीत चिऱ्यासंगतीला हिऱ्यासारखी माणसे जन्मती’ ही वसंत सावंत यांच्या कवितेची ओळ वरील सर्व साहित्यिकांसाठीच लिहिली आहे, असे मला सारखे वाटत आहे.

उज्ज्वला धानजी या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाच्या कार्यकर्त्या. ‘गुण गुण गाणी’ या कवितासंग्रहाने रसिकांचे लक्ष वेधून घेतलेले दिवंगत कवी वसंत आपटे यांच्यावर त्यांनी सुंदर लेख लिहिला आहे. त्या निमित्ताने फोंडाघाट येथील सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसाही धानजी यांनी छान शब्दबद्ध केला आहे. किंजवड्याचे मूळ रहिवासी असलेल्या प. स. देसाई ह्या फार मोठ्या साहित्यिकावरही धानजी यांचा लेख या पुस्तकात आहे. खूप खूप मेहनत घेऊन केलेले हे लेखन वाचकांना नक्कीच आवडेल.

आचरे गावच्या दिवंगत कवयित्री प्रतिभा आचरेकर यांच्यावर शीतल पोकळे त्यांनी लिहिलेला लेख आवर्जून वाचावा असा आहे. प्रतिभा आचरेकर यांच्यातील भावकोमल कवयित्रीचे शब्दचित्रण शीतल पोकळे यांनी खूप छान पद्धतीने केले आहे.

‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ यांच्यावर ऋतुजा केळकर यांनी लिहिलेला लेख खूपच महत्त्वाचा आहे. ऋतुजा केळकर या ग्रंथपाल आहेत. अनेक साहित्यिक संदर्भ त्यांच्यापाशी आहेत. त्यामुळे पा. ना. मिसाळ यांच्यावर त्यांनी लिहिलेला लेख मुळातूनच वाचावा असा आहे. लुई फर्नांडिस या एके काळी गाजलेल्या कथालेखकाचा परिचय करणारा लेखही त्यांनी लिहिला आहे.

नाटककार ल. मो. बांदेकर यांच्यावर सुजाता टिकले यांनी लिहिलेला लेखही चांगला आहे. कणकवलीचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या लेखकीय कारकिर्दीचा आलेख संगीतकार, गुणी गायक आणि साहित्यप्रेमी माधव गावकर यांनी उत्तम मांडला आहे. आ. द. राणे यांच्यावर श्रद्धा वाळके यांनी उत्तम लेख लिहिला असून, तो पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. हरिहर आठलेकर या विनयशील आणि प्रासादिक व्यक्तिमत्त्वाचा परिचयही श्रद्धा वाळके यांनी करून दिला आहे.

आचरे गावचे सुपुत्र जी. टी. गावकर या महान व्यक्तिमत्त्वाचा परिचय सुगंधा गुरव यांनी आपल्या लेखातून नेमकेपणाने करून दिला आहे. तेजल ताम्हणकर यांनी विजय चिंदरकर या मनस्वी कवीचा परिचय करून दिला आहे. तेजल या स्वतः शब्द, सूर आणि कलात्मक उपक्रमांत रमणाऱ्या आहेत. त्यांनी विजय चिंदरकरांवर मनापासून लिहिले आहे.

शिवराज सावंत यांनी आ. ना. पेडणेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. श्रीमती वैजयंती विद्याधर करंदीकर यांनी विद्याधर भागवत यांच्यावर लिहिलेला लेख खूपच भावस्पर्शी आहे असून, भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय वैजयंतीबाईंनी उत्तम पद्धतीने करून दिला आहे.

उमेश कोदे यांनी ज्योतिषाचार्य वसंत म्हापणकर यांच्यावर लिहिलेला लेख खूप अभ्यासपूर्ण वाटला. सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार आणि सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व असणारे साहित्यिक श्रीपाद काळे यांच्यावर मधुरा माणगावकर यांनी लिहिलेला लेखही असाच वाचनीय आहे. काळे यांची वाङ्मयीन कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्व याचे चित्रण त्यांनी उत्तम प्रकारे केले आहे.

‘जनयुग’कार खांडाळेकर यांच्यावर सदानंद कांबळी यांनी लिहिलेला लेख माहितीपूर्ण आहे. एके काळी सत्य कथेचे लेखक म्हणून नावलौकिक मिळवलेले आणि अफाट प्रतिभेचे धनी असणारे बाळकृष्ण प्रभुदेसाई या कथालेखकाचा नीटस परिचय प्राध्यापिका डॉ. उज्ज्वला सामंत यांनी करून दिला आहे.

सिंधुदुर्गातील रहिवासी आणि नागपूरमध्ये संशोधनाचे काम करणारे महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांच्याविषयी अतिशय मौलिक असा लेख या पुस्तकात आहे. तो सुरेश ठाकूर यांनी लिहिला आहे एवढे सांगितले तरी पुरे. म्हणजे त्या लेखाचा दर्जा लक्षात येईल.

मी येथे या सर्व साहित्यिकांचा आणि त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा फक्त ओझरता उल्लेख केला आहे. ज्यांच्यावर लेख लिहिले आहेत ते सर्व लेखक आणि कवींच्या साहित्यिक कारकिर्दीवर एकेक प्रबंध होईल. या विषयाला गवसणी घालण्याचे काम या सर्व लेखकांनी आणि सुरेश ठाकूर यांनी केले आहे.

आजकालचा जमाना जुन्या साहित्यिकांना जाणूनबुजून अडगळीत टाकण्याचा आहे. साहित्यातील कित्येक देदीप्यमान दालने आज विस्मृतीच्या काळोखात लोप पावत आहेत. म्हणून ह्या काळात हे पुस्तक फार महत्त्वाचे वाटते. स्वतःच्या नावाचाच डंका वाजत राहील, याचाच विचार करणाऱ्या आजच्या कवी-लेखकांनीही दिवंगत साहित्यिकांचा परिचय वाचकांना करून द्यावा असे मला वाटते.

‘वि. स. खांडेकर साहित्यिकच नव्हते,’ असे विधान राजरोसपणे करणाऱ्या साहित्यिकांनी खांडेकरांसह कोकणात होऊन गेलेल्या साहित्यिकांकडे नजर टाकावी, असेही या निमित्ताने मला आवर्जून सांगावेसे वाटते. साहित्यिकांच्या स्मृतीला उजाळा द्यावा हे सुरेश ठाकूर यांच्या मनात आले ही खूप चांगली गोष्ट आहे. ठाकूर यांनी त्याची सुरुवात करून दिली आहे. या पुस्तकाच्या रूपाने उत्तम सरित्सागर संगम झाला आहे.

  • मधुसूदन नानिवडेकर
  • (ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे ११ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या गद्य लेखनाची आठवण म्हणून.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply