राज्यातील पाऊस, नैसर्गिक आपत्तींची ‘लाइव्ह’ माहिती लोकसहभागातून देणारी ‘सतर्क’ची वेबसाइट सुरू

‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या (सीसीएस) ‘सतर्क’ या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून महाराष्ट्रातील पावसाच्या सद्यस्थितीची माहिती देणारी http://www.citizenweather.in ही वेबसाइट ३० जुलै २०२१ रोजी सुरू झाली आहे. राज्यभरात सध्या कोठे पाऊस सुरू आहे, मोठ्या पावसामुळे काही दुर्घटना घडली आहे का, याची माहिती या वेबसाइटद्वारे नागरिक आणि प्रशासनाला नेमक्या स्थानासह नकाशावर पाहता येईल.

महाराष्ट्रातील कोणत्याही भागांतील नागरिक या वेबसाइटवर आपल्या भागात सध्या सुरू असलेल्या पावसाची दृश्य स्वरूपातील नोंद एक मिनिटापेक्षा कमी वेळात करू शकतात. त्यांची नोंद तत्काळ गुगल मॅपवर त्यांच्या निरीक्षणाच्या तपशीलासह दिसू लागते. या निरीक्षणांमध्ये पावसाचे स्वरूप, वाऱ्यांचे स्वरूप, पाणी साचणे, फ्लॅश फ्लड, झाडे पडणे, दरड कोसळणे, रस्ता खचणे, भिंत पडणे आदी घटनांचा समावेश आहे. निरीक्षण नोंदवण्यासाठी नागरिकांना त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी ‘जीपीएस’ला परवानगी देणे आवश्यक आहे. वेबसाइटला भेट देणाऱ्या सर्वांना गेल्या एक, तीन, सहा आणि बारा तासांतील पावसाच्या नोंदी नकाशावर दिसू शकतात.

याशिवाय वेबसाइटवर सध्याची उपग्रहीय आणि रडार चित्रे, हवामान विभागाचा पुढील २४ तासांचा पावसाचा अंदाज, हवामानाशी संबंधित उपयुक्त वेबसाइट्स, आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणारे संपर्क क्रमांक यांचीही माहिती मिळू शकेल.

हा नागरिकांनी नागरिकांसाठी चालवलेला उपक्रम असून, आपत्तींमधून होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करणे हा या उपक्रमामागील हेतू आहे. महाराष्ट्रातील अधिकाधिक नागरिकांनी, सातत्याने www.citizenweather.in या वेबसाइटवर आपल्या भागातील पावसाची माहिती देत राहावी, असे आवाहन ‘सतर्क’तर्फे ‘सीसीएस’चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी आणि ‘सीसीएस’चे सचिव मयुरेश प्रभुणे यांनी केले आहे.

ही वेबसाइट कोणाला उपयुक्त?
नागरिक : सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरील पावसाच्या अद्ययावत नोंदी पाहून प्रवासाचा मार्ग निश्चित करता येऊ शकतो. आपल्या भागात झाड पडणे, भिंत पडणे, पाणी साचणे, पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असल्यास, तसेच दरड कोसळणे, पूर येणे आदी मोठ्या घटना घडल्या असल्यास प्रशासनाला, तसेच इतर नागरिकांना घटनेच्या नेमक्या स्थानासह माहिती देता येऊ शकते.

प्रशासकीय यंत्रणा : राज्यभरातील नागरिकांकडून पावसाच्या आणि दुर्घटनांच्या नोंदी येणे अपेक्षित असून, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर प्रशासन, पोलीस, फायर ब्रिगेड, वाहतूक पोलीस यांना त्या घटनांची अचूक स्थानासह माहिती मिळाल्यामुळे तात्काळ उपाययोजना करणे शक्य होईल.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मोठ्या पावसाच्या काळात अशा घटनांची राज्याच्या विविध भागांतून नेमक्या स्थानासह लाइव्ह माहिती मिळणार असल्यामुळे बचावकार्यासाठी योजना आखणे सोपे जाईल.

वामान शास्त्रज्ञ : हवामान शास्त्रज्ञांना त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात नेमका कोठे आणि कोणत्या स्वरूपातील पाऊस झाला आहे याची माहिती मिळू शकेल.

‘सतर्क’विषयी
पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेतर्फे १५ ऑगस्ट २०१५ रोजी ‘सतर्क’ हा दरडींची पूर्वसूचना देणारा उपक्रम सुरू करण्यात आला होता. माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर अशा दरडींच्या घटनांमधून होणारी जीवितहानी कशी टाळता येऊ शकेल याविषयी ‘सीसीएस’तर्फे वर्षभर अभ्यास करण्यात आला. त्यातूनच सह्याद्री, कोकणातील दरडप्रवण क्षेत्रांवरील पावसावर सतत नजर ठेवून दरडींची पूर्वसूचना देण्याचा उपक्रम सुरू झाला.

गेली सात वर्षे मोठ्या पावसाच्या काळात ‘सतर्क’तर्फे सातत्याने दरडींच्या पूर्वसूचना देण्यात आल्या असून, त्यांपैकी बहुतेक ठिकाणी लहान – मोठ्या दरडींच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामातही ‘सतर्क’तर्फे कोकण आणि घाट क्षेत्रासाठी दरडींच्या सातत्याने पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. यासंबंधीच्या सर्व नोंदी ‘सतर्क’चे फेसबुक पेज, तसेच ट्विटर हँडलवर पाहता येतील.

‘सतर्क’तर्फे गेल्या दोन वर्षांत विजांसह वादळी पाऊस, अतिवृष्टी आणि चक्रीवादळ यांसंबंधीच्या पूर्वसूचना देण्याचेही काम सुरू झाले. त्यासाठी उपग्रहीय चित्र, रडार आदी हवामानाच्या सद्यस्थितीतील नोंदींचा वापर केला जातो. या उपक्रमाचाही राज्यभरातील अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून आले.

राज्याच्या विविध भागांतील हवामानाचे सद्य चित्र समजावे, त्याचप्रमाणे ‘सतर्क’तर्फे दिले जाणारे इशारे स्थानिक पातळीवर पोहोचावेत यासाठी यंदापासून ‘सतर्क कम्युनिटी’ हा उपक्रमही सुरू झाला आहे. या उपक्रमामध्ये राज्यभरातील २५० नागरिकांचा सहभाग आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी,
उपाध्यक्ष, सीसीएस – 9822099616
मयुरेश प्रभुणे, सचिव, सीसीएस – 9922929165

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply