गेली दोन वर्षं जग व्यापून टाकलेल्या करोना विषाणूच्या संसर्गाचं संकट अजून पूर्णतः संपलेलं नाही, तरीही त्याची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. करोना विषाणूच्या या संसर्गाने मानवजातीचं खूप मोठं नुकसान केलं नि त्याला बऱ्याच गोष्टींची जाणीवही करून दिली. त्यातलीच एक प्रमुख गोष्ट म्हणजे प्रत्येकाकडे असलेल्या नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीचं महत्त्व. लशीने करोनाशी लढण्याचं बळ नक्कीच दिलं; पण अंगभूत रोगप्रतिकारशक्तीला पर्याय नाही, याची जाणीव आता प्रत्येकालाच झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जण आता नैसर्गिक इम्युनिटी वाढवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नरत आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी साप्ताहिक कोकण मीडियाने यंदाचा (२०२१) दिवाळी अंक इम्युनिटी या विषयावर करायचं ठरवलं. हा अंक आता प्रसिद्ध झाला असून, त्या अंकाचे अंतरंग येथे उलगडून दाखवले आहेत. इम्युनिटी या विषयावरचे विविध तज्ज्ञांचे लेख, वैचारिक लेख, इम्युनिटी विशेष व्हिडिओ मालिका, तसंच इम्युनिटी या विषयावर घेतलेल्या कथा स्पर्धेतल्या विजेत्या कथा, अन्य कथा, कविता, व्यंगचित्रं अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी या अंकात आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
अंकाची किंमत : १५० रुपये
हा अंक मुंबई, पुणे, रत्नागिरीत विविध ठिकाणी उपलब्ध आहे. अंक घरपोच मागवण्यासाठी कृपया https://wa.me/919850880119 या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करून आपली मागणी नोंदवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२३८२६२१, ९४२३२९२१६२
हा अंक ई-बुक स्वरूपातही विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. त्याच्या लिंक्स सोबत देत आहोत.
बुकगंगा डॉट कॉम : https://www.bookganga.com/R/8FEJK
मॅग्झटर : https://bit.ly/3EsKdBy
गुगल प्ले बुक्स : https://bit.ly/2ZE325W
………….
धनेज : आद्यगुरू धन्वंतरीचे अंतिम स्थळ
आयुर्वेदाचे आद्य दैवत भगवान धन्वंतरी यांचे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजन केले जाते. गुजरातचे आयुर्वेदासंदर्भात मोठे योगदान आहे; मात्र भगवान धन्वंतरी यांचे समाधिस्थळ गुजरातमध्ये आहे हे फारच थोड्या व्यक्तींना माहिती आहे. वेरावळ रेल्वेस्थानकापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धनेज या गावी भगवान धन्वंतरींची समाधी आहे. त्या गावात त्यांच्यासंबंधीच्या काही आख्यायिका आणि त्यांचा संदर्भ आजही देणाऱ्या वस्तू, वास्तू आणि वृक्ष आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण स्थळाची ओळख करून देणारा माहितीपूर्ण लेख रत्नागिरीतील वैद्य मंदार भिडे यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या यंदाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात लिहिला आहे.
करोनापश्चात प्रतिकारशक्तीसाठी…
गेलं दीड वर्ष आपण सतत करोना महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. आयुर्वेद आणि योग या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत आणि प्रामुख्याने रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याबाबत मार्गदर्शन करणारा लेख राष्ट्रीय आयुर्वेद गुरू प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई (सावंतवाडी) यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात लिहिला आहे.
सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार
आज शारीरिक इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्तीवर जगभर प्रचंड चर्चा होते आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे विचार मांडले होते, त्यातून त्यांनी देशबांधव आणि भगिनींच्या शारीरिक, मानसिक इम्युनिटीसह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इम्युनिटीचाही विचार केला होता, हे जाणवतं. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी. त्यांच्या रत्नागिरी प्रवेशाला यंदाच १०० वर्षं पूर्ण झाली. सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही सुरू आहे. या औचित्याने, सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणारा प्रदीर्घ लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात अनिकेत कोनकर यांनी लिहिला आहे.
भीतीच्या सावटाखाली जीवन
इतर पशूंच्या तुलनेत माणसांची वाढ अमर्याद होते आहे. ती निसर्गनियमामध्ये बसत नसावी. त्यामुळे मानवजात मर्यादित ठेवण्याचे निसर्गाचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात. वार्धक्य आणि नैसर्गिक मृत्यू याद्वारे सर्वच सजीवांची वाढ मर्यादित ठेवली जाते. तसंच, विविध रोगजंतू उत्परिवर्तित करून निसर्ग ही वाढ मर्यादित ठेवतो. अशा अनेक रोगजंतूंवर मानवाने विजय मिळवला आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. मानव विरुद्ध निसर्ग अशी ही लढाई अनंतकाळ सुरू राहणार आहे. कारण मानवाला निसर्गावर ‘संपूर्ण’ (?) विजय मिळवायचा आहे. या विषयाच्या अनुषंगाने डहाणू येथील शशिकांत काळे यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात लेख लिहिला आहे.
मानसिक संतुलनाची रिकव्हरी पद्धत
करोनाच्या आजारात मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं आहे. त्या अनुषंगाने मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तींना प्रतिकारशक्ती देणाऱ्या पद्धतीची माहिती देणारा लेख पुण्यातील ‘एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ’चे अध्यक्ष डॉ. अनिल वर्तक यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात लिहिला आहे.
करोना : निसर्गाचा एक शाप!
आपण रोज खात असलेल्या अन्नातून प्रतिकारशक्तीस आवश्यक असणारे घटक मिळणं अपेक्षित असतं. परंतु फास्ट फूडच्या नावाखाली आपण निव्वळ कचरा पोटात ढकलतोय. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आज अन्न म्हणून आपल्याकडे काय उपलब्ध आहे? एकंदरीतच निसर्गाला अपेक्षित असे वर्तन मनुष्याकडून घडतच नाही. त्यामुळे करोना महामारी हे निमित्त असून, निसर्गाचा तो जणू शापच आहे. मंडणगड येथील दिनेश पेडणेकर यांनी या अनुषंगाने लिहिलेला लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
वाढवू या रोगप्रतिकारक शक्ती
माणसाची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, तर तो कोणत्याही आजाराचा मुकाबला सहजपणे करू शकतो, हे जगाने मान्य केले असले, तरी प्रत्येकाची जगण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तो या आजारावर सहज मात करू शकतो. खेड (जि. रत्नागिरी) येथील अनिल गुजराथी यांचा या विषयावरील लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात वाचता येईल.
सावध ऐका मागल्या हाका!
इम्युनिटी हल्लीच्या पिढीमध्ये कमी कमी का होते आहे, याची कारणे शोधून पाहता असे आढळून आले, की पूर्वापार जे नैसर्गिक जीवन माणसे जगत होती, त्या राहणीमानात, जीवनशैलीत आणि आताच्या राहणीमानात, जीवनशैलीत प्रचंड तफावत आहे. हीच तफावत अनेक रोगांना, आजारांना निमंत्रण देत आहे. मागच्या काळातल्या या चांगल्या गोष्टींकडे लक्ष वेधणारा लेख लांजा येथील सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात लिहिला आहे.
शरीराचे घड्याळ आणि अंगभूत रोगप्रतिकारशक्ती
लॉकडाउन आणि करोनाने शरीराचे घड्याळ अस्थिर केले होते. शरीराचे जुने घड्याळ आता कार्यरत नाही आणि संक्रमण घड्याळ चालवणे अगत्याचे झाले आहे. करोनाचा हा परिणाम सकारात्मक आहे की नकारात्मक हे येणारा काळ ठरवेल; पण शरीराचे घड्याळ आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी पोषक ठरत असेल, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. या अनुषंगाने पुण्यातील सुरेश कोडीतकर यांनी लिहिलेला लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सामाजिक प्रतिकारशक्तीसाठी…
धावपळीच्या जगात आपल्याला आत्मपरीक्षणासाठी ब्रेक मिळणं गरजेचं होतं, तो करोनाने दिला आहे. व्यक्तिगत प्रतिकारशक्तीची गरज तर आहेच; पण समाजातले विविध प्रश्न लक्षात घेतले, तर सामाजिक प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला हवी आहे. मुंबईतील आशीष निनगुरकर यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखातून हा विचार मांडला आहे.
सुखाच्या गुजगोष्टी
सुख म्हणजे नक्की काय असते? ज्याला रात्री अंथरुणात पडल्या पडल्या झोप येते, तो सुखी. जो माणूस झोपताना चिंता करतो, तो सुखी नव्हे. चिंतेचे समूळ उच्चाटन हेच सुखाचे आसन होय. पोई (जि. ठाणे) येथील धनाजी बुटेरे यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या इम्युनिटी विशेष दिवाळी अंकातील लेखात याबद्दल भाष्य केलं आहे.
वार्षिक राशिभविष्य
मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील आनंद बा. करंबेळकर गुरुजी यांनी लिहिलेले वार्षिक राशिभविष्य – नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२
कथा स्पर्धेतील विजेत्या कथा
साप्ताहिक कोकण मीडियाने या दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति इम्युनिटी कथा स्पर्धेतील सर्व विजेत्या कथा या अंकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कथांचं परीक्षण ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलं. त्यांचे या कथांविषयीचं मनोगतही अंकात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कथालेखन सशक्त होत असल्याचा अभिप्राय त्यांनी नोंदवला आहे.
प्रथम क्रमांक : अस्मिता अविनाश महाजन, पुणे
कथेचे शीर्षक : रात्रंदिन आम्हां…
द्वितीय क्रमांक : अमोल अनंत पालये, रत्नागिरी
कथेचे शीर्षक : मृदुंग
तृतीय क्रमांक : नीलेश श्रीकृष्ण कवडे, अकोला
कथेचे शीर्षक : करोनावर मात…
उत्तेजनार्थ :
मनीषा चिंतामणी आवेकर, पुणे (कथेचे शीर्षक : आरोग्य हीच संपत्ती)
यशवंत तुकाराम सुरोशे, मुरबाड, ठाणे (कथेचे शीर्षक : इच्छाशक्ती)
अमित पंडित, कनकाडी (संगमेश्वर), रत्नागिरी (कथेचे शीर्षक : अॅटमबॉम्बचा आजार)
अन्य कथा
या स्पर्धेशिवाय अन्य २० कथाही या दिवाळी अंकात समाविष्ट आहेत. त्यात वेगवेगळ्या विषयांवरच्या विनोदी, वैचारिक आदी प्रकारच्या कथांचा त्यात समावेश असून, त्या मराठी आणि मालवणी बोलीतील आहेत.
पुनर्जन्म : डॉ. चंद्रशेखर जोशी, रत्नागिरी
पाऊस अन् बरंच काही… सौ. राधिका सचिन आठल्ये, रत्नागिरी
बूमरँग : सौ. सुनेत्रा विजय जोशी, रत्नागिरी
धकूनाना : बाबू घाडीगांवकर, दापोली
मानसांपरास जनावरा इमानी : महेश सीताराम गोसावी, चिंदर, मालवण
सतीचा वाडा : दीपक नागवेकर, शिपोशी, लांजा
गेले द्यायचे… : किरण आचार्य, बदलापूर
कावनातला गुलूगुलू : सौ. गीता गजानन गरूड
सेकंड ऑप्शन : राजेश गोसावी, लांजा
एक समतोल तराजू न्यायाचा! : माधव गावकर, कणकवली
सकारात्मकतेचा बूस्टर डोस : मंगल पटवर्धन, रत्नागिरी
विश्वास : रामकृष्ण विनायक अभ्यंकर, बोरीवली
सर्प आणि चंदन : माधव गवाणकर, दापोली
पसंत आहे आजेसासू : डॉ. समिधा गांधी, पनवेल
खापऱ्याचो आंबो : श्रीकांत जाधव, वांद्रे
कथाबीज : यशवंत सुरोशे, मुरबाड
मळभ : रसिका तेंडोलकर, कसाल
वृद्धाश्रम – काळाची गरज : शोभना कारंथ, मुंबई
सोन्याची लेखणी : बबलू कराळे, अमरावती
देवाची नजर : एकनाथ गायकवाड, मालवण
कविता
माधव गावकर (कणकवली), राजेंद्र राणे (मुंबई), प्रकाश क्षीरसागर (गोवा), श्रीकांत आठवले (रत्नागिरी), आशीष निनगुरकर (मुंबई), रामकृष्ण पाटील (नंदुरबार), महेश भालेराव (औरंगाबाद) आणि रवींद्र दळवी (नाशिक) यांच्या कविता या दिवाळी अंकात वाचता येतील.
व्यंगचित्रे
योगेश चव्हाण, दत्तात्रय म्हेतर यांनी काढलेली व्यंगचित्रे अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
मुखपृष्ठाची गोष्ट
२०२० आणि २०२१ ही दोन्ही वर्षं अख्ख्या जगाने करोनाचं संकट अनुभवलं. आता संकटाची तीव्रता कमी झाली असली, तरी ते संकट पूर्णतः ओसरलेलं नाही. शास्त्रज्ञांच्या अविरत प्रयत्नांतून विकसित झालेल्या लशींमुळे करोनाशी प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याला नक्कीच मिळाली आहे; मात्र शरीरातली नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती सर्वांत महत्त्वाची असल्याचं आज जगभरातले तज्ज्ञ सांगत आहेत. म्हणूनच रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी हा विषय घेऊन हा दिवाळी अंक प्रसिद्ध करत आहोत. इम्युनिटी विकसित होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, याबद्दलचे तज्ज्ञांचे लेख या अंकात असून, विविध पॅथीतल्या डॉक्टर्सचे व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रत्येकाने आपापल्या शास्त्राच्या अभ्यासानुसार इम्युनिटीसाठी आवश्यक बाबींची माहिती दिली आहे. तरीही त्या सगळ्यांच्या सांगण्यात एक समान सूत्र आहे, ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनशैलीचं. आपलं रोजचं वेळापत्रक ठरवून काटेकोरपणे पाळलं, तर इम्युनिटी विकसित होण्यास खूप मोठा हातभार लागतो, असं सगळ्यांच्या म्हणण्याचं सार आहे. ही गोष्ट अगदी साधी आणि बहुतांश जणांना माहिती असली, तरी तिच्या अंमलबजावणीचं प्रमाण कमी आहे. म्हणूनच या अंकाच्या मुखपृष्ठावर आपल्या दैनंदिन जीवनशैलीचं चक्र दाखवण्यात आलं आहे. ते चक्र व्यवस्थित फिरवलं गेलं, तरच इम्युनिटीच्या दिशेची आपली वाटचाल सुकर होऊ शकेल. त्यातून आपल्या अंतरीचे दीप प्रज्ज्वलित होतील आणि विचारचक्राला चालना मिळेल, अशी आशा आहे. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या नामांकित संस्थेचा पदवीधर असलेला रत्नागिरीतला हरहुन्नरी तरुण कलाकार प्रहर विठ्ठला महाकाळ (७२०८७७७६१८) याने हे मुखपृष्ठ साकारलं आहे.
इम्युनिटी विशेष – व्हिडिओ मालिका
इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारशक्ती या विषयाचं गांभीर्य गेल्या दोन वर्षांत जवळपास प्रत्येकाला कळून चुकलं आहे. वरवर सोपा वाटला, तरी प्रत्यक्षात हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, राहणीमान, कामाचं स्वरूप, आहार, राहण्याचा प्रदेश, आनुवंशिकता, चांगल्या-वाईट सवयी अशा किती तरी गोष्टींवर रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाच्या रोगप्रतिकारशक्तीला एका तराजूत तोलता येणं शक्य नाही. शिवाय रोगप्रतिकारशक्ती मोजण्याचं काही विशिष्ट असं परिमाणही नाही. तरीही आपली दिनचर्या, आहार आणि एकंदरीतच जीवनशैली आदी काही गोष्टींमध्ये चांगले बदल केले आणि आणि त्यात सातत्य राखलं, तर प्रत्येकाला आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राखता येऊ शकते. म्हणूनच या इम्युनिटी विशेषाकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांतले अनुभवी डॉक्टर्स आणि तज्ज्ञ यांचे व्हिडिओ साप्ताहिक कोकण मीडियाच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आयुष्यात घरच्या घरी आपण कोणत्या साध्या-सोप्या गोष्टी करू शकतो, काय टाळू शकतो, याबद्दलचं मार्गदर्शन त्यात करण्यात आलं आहे. हे व्हिडिओ https://www.youtube.com/c/KokanMediaRatnagiri या लिंकवर आमच्या यू-ट्यूब चॅनेलवर पाहता येतील. इम्युनिटी विशेष व्हिडिओची प्लेलिस्ट सोबत देत आहोत. हे व्हिडिओ आमच्या वाचक-प्रेक्षकांना नक्कीच उपयुक्त ठरतील. व्हिडिओ पाहून आपले अभिप्राय कळवावेत, तसंच व्हिडिओच्या लिंक्स जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवून इम्युनिटीविषयी जागृती करावी, असं आवाहन करत आहोत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
2 comments