दिवाळी पाडव्याला ‘स्वराभिषेक’तर्फे रत्नागिरीत पहाट मैफल

रत्नागिरी : करोनाच्या प्रादुर्भाव ओसरायला सुरुवात झाली असताना दिवाळीच्या निमित्ताने रत्नागिरीतील सांगीतिक उपक्रमांना नव्याने उत्साहात सुरुवात होत आहे. दिवाळी पाडव्याला रत्नागिरीवासीयांना सुरांची मेजवानी मिळणार आहे.

स्वराभिषेक-रत्नागिरी आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी करोनाविषयक निर्बंधांमुळे ही मैफल ऑनलाइन स्वरूपात सादर झाली होती; मात्र हळूहळू हे करोनाचे सावट दूर झाल्याने थंडावलेल्या सांगीतिक चळवळीला पुन्हा प्रारंभ होत आहे. जयेश मंगल पार्कमध्ये ५ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता ही मैफल होईल. यामध्ये सौ. विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली त्यांचा शिष्यवर्ग सुमधुर गीतांची दिवाळी भेट रसिकांना देणार आहे.

या वेळी महेश दामले (सिंथेसायझर), मंगेश मोरे (हार्मोनियम), मंगेश चव्हाण (ढोलक, पखवाज), केदार लिंगायत (तबला), अद्वैत मोरे (तालवाद्य) यांची संगीतसाथ असेल. महेंद्र पाटणकर यांचे निवेदन असून, एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत ध्वनिसंयोजन करणार आहेत. मैफलीकरिता अॅड. राजशेखर मलुष्टे आणि ‘स्वराभिषेक’च्या पालकवर्गाचे, तसेच टीम स्वराभिषेकचे विशेष सहकार्य लाभले आहे. करोनाविषयक सर्व नियम पाळून रसिकांनी मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ही मांगल्याची पहाट आलेल्या संकटांचा नाश करणारी ठरो, अशी प्रार्थना ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’तर्फे आयोजित दिवाळी पहाट मैफलीद्वारे केली जाणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply