रत्नागिरी-सिंधुदुर्गात ३९४५ जणांना मिळू शकते ५० हजारांचे विशेष करोना अनुदान

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकाला ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील २४८७, तर सिंधुदुर्गातील १४५८ जणांना या अनुदानाचा लाभ मिळू शकेल.

करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाइकाला ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य शासनाने संकेतस्थळ विकसित केले आहे. तेथे संबंधितांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार करोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाइकाला ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याबाबत राज्याच्या महसूल आणि वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाइकाला सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग इन करणे आवश्यक आहे. https://epassmsdma.mahait.org/login.htm यावरदेखील लिंक देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रांची माहिती अशी : अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील (त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील) या कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराचा मोबाइल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉग इन करता येईल.

करोनामुळे मृत्यू झाला, अशी केंद्र शासनाकडे ज्यांची नोंद झाली असेल, अशा व्यक्तींच्या नातेवाइकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, करोना मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणेदेखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर करोनामुळे मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट करणारी कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागतील.

एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हा, नगरपालिका स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपील करण्याचे आणि या समितीला अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपील करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधारसंलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक (02352) 226060 आणि 222233 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४८७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गात १ हजार ४५८ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली. या मृतांच्या जवळच्या एका नातेवाइकाला ५० हजाराचे विशेष करोना सानुग्रह अनुदान शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply