ऐतिहासिक प्रभानवल्ली गावात रंगले ग्रामीण साहित्य संमेलन

डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : मायमराठी भाषेचा गौरवदिन एका आठवड्यावर येऊन ठेपला असताना, विशाळगडाच्या पायथ्याशी, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या मुचकुंदी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावी अडीच दिवसांचा अक्षरमेळा भरला. गेल्या १८ फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योतीच्या मिरवणुकीने हा उत्सव सुरू झाला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट या गावापासून आणि १९ फेब्रुवारी रोजी साहित्यप्रेमींची पावले आणि वाहने प्रभानवल्लीच्या दिशेने वळू लागली.

भल्या सकाळीच शिवशाही मराठमोळ्या पोशाखात सजलेल्या युवकयुवतींचे ढोल आणि लेझीम पथक ठेका धरू लागले आणि पाठोपाठ सुरू झाली ग्रंथदिंडी. तिची सांगता झाली येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात. कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध कवी अशोक लोटणकर यांच्या हस्ते संघाच्या ध्वजाचे आरोहण आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर दोन मांडपांमध्ये संमेलनाचे कार्यक्रम सुरू झाले.

राजापूर लांजा नागरिक संघ, मुंबई आणि प्रभानवल्ली व खोरनिनको या शेजारी गावांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. लांजा येथील साहित्यिक विलास कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली २०१५ साली झालेल्या पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सप्तपदी प्रभानवल्ली येथील संमेलनाच्या रूपाने पूर्ण झाली.

रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांचे सासर असणारे लांजा तालुक्यातील कोट हे गाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणावे, तसेच मुंबई-गोवा महामार्गावर गव्हाणे फाटा येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात यावे, असे दोन महत्त्वाचे ठराव या संमेलनात एकमुखाने संमत करण्यात आले. संघाचे लांजा येथील प्रवक्ते आबा सुर्वे यांनी ते सूचित केले होते.

१९५३ पासून संस्था कार्यरत असणाऱ्या या संघाच्या सरचिटणीस स्नेहल आयरे यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यांच्या प्रगतीत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची, म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, चांगली पुस्तके ग्रामीण भागातील मुलांना पाहायला मिळावी, हा संमेलनाच्या आयोजनामागे एक महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. एकाआड लांजा व राजापूर तालुक्यांमध्ये संमेलन भरवले जाते. महिलांमधील आत्मविश्वास वाढावा यासाठी बचत गटांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. दोन्ही तालुक्यांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्याचा तसेच शहराचे आकर्षण दूर ठेवून गावातच राहून संसार करण्यास तयार झालेल्या नववधूच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला जातो. मर्यादित चौकटीत स्वतःला बांधून न ठेवता समाजोपयोगी कार्य हाती घेतले. कोविड काळात मदत, चिपळूण पूर आपत्तीत मदत. आपत्कालीन प्रसंगी मदतीला धावून जाण्यासाठी कायमस्वरूपी पथक निर्माण केल्याची  माहिती श्रीमती आयरे यांनी दिली.

स्वागताध्यक्ष विठोबा चव्हाण यांनी प्रभानवल्ली आणि खोरनिनको या दोन्ही गावांतील सामाजिक सलोखा आणि इतिहासाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख आपल्या भाषणात केला. या गावात भरणाऱ्या जत्रेला साहित्याच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कुडाळ येथील राऊळ महाराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि मराठी संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्ता पवार यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, कोकणात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची मोजदाद करण्याचे काम या संघाने केले…. साहित्य माणसाचे आयुष्य वाढवते. एक कथा, कादंबरी वाचली की कितीतरी माणसे त्यात भेटतात, मी यात कोठे दिसतो का त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न वाचणारा करतो. जे अकल्याणकारक आहे त्याचा क्षय करते ते साहित्य अशी कल्पना त्यांनी मांडली.

उद्घाटन करताना अशोक लोटणकर

अध्यक्षीय भाषणात साहित्य संमेलनांची परंपरा, ग्रामीण साहित्य संमेलनांचा प्रारंभ आणि प्रसार तसेच राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनांची थोडक्यात माहिती देऊन कविवर्य अशोक लोटणकर यांनी वर्तमानातील ग्रामीण साहित्याच्या आशयाचा आढावा घेत भविष्यातील साहित्याकडून असणाऱ्या अपेक्षांबद्दल भाष्य केले. बदलत्या परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात पडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. नव्या पिढीला पुस्तक वाचण्याची गोडी लावणे, इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग करण्याकडे विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजे असे ते म्हणाले.

कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसची शाखा असलेल्या सत्त्वश्री प्रकाशनाने सिद्ध केलेल्या अशी घडली राजस्विनी या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटनाच्या समारंभात झाले. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड हे यावेळी उपस्थित होते. साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर आणि साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पहिल्या दिवसाच्या दुपारनंतरच्या सत्रात प्रसिद्ध ‘दूरदर्शन’ निवेदिका दीपाली केळकर यांचे ‘पारंपरिक ओव्या आणि उखाणे’ या विषयावर अतिशय सुरेख व्याख्यान झाले. गडकिल्ल्यांचे अभ्यासक भगवान चिले यांचे विशाळगड आणि परिसराबद्दल भाषण झाले.

सूर्यास्तानंतरच्या सत्राचा प्रारंभ भैरवी जाधव आणि तिचे सहकारी यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या चित्रकथी आणि कळसूत्री बाहुली या पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन कार्याबद्दल नुकताच ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आलेले परशुराम गंगावणे यांची उपस्थिती हा या सत्रातील विशेष होता. ‘मराठी शुभेच्छापत्रांचे जनक’ प्रसाद कुळकर्णी यांचा श्रोत्यांशी संवाद आणि कविसंमेलन झाल्यानंतर रेकॉर्ड डान्स झाले आणि पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

(राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply