डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : गावी सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विविधांगी कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या आनंद यात्रा या कार्यक्रमातून नर्म विनोदाची पखरण करत वि. शं. चौघुले साहित्यनगरी सकारात्मक ऊर्जेने भारून टाकली.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने प्रभानवल्ली येथे भरविलेल्या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या रात्रीच्या सत्रात श्री. कुलकर्णी यांचा हा कार्यक्रम झाला. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घ्यावा हे सांगताना ते म्हणाले की, जिंदगीभर यही गलती करते रहे ढोल की चेहरे पर और आईना साफ करते रहे आपल्याला चांगले जगता आले पाहिजे. टीव्हीवरील कार्यक्रमाबाबतीत आणि बातम्यांबाबत टिपणी करताना नॅशनल जिओग्राफी आणि डिस्कव्हरी चॅनेलचा आनंद घेण्याचा त्यांनी सल्ला दिला. विमानातून उडी घेताना पॅरॅशूट उघडले नाही तर, अशा शंका व्यक्त करून त्यातील थ्रील अनुभवले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आनंद ही परमेश्वराने दिलेली विनामूल्य गोष्ट आहे. आनंद उपभोगण्याचे शिक्षण शाळेत दिले जात नाही. मात्र आपणच ते अंगी बाणवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
आयुष्य खूप छान आहे. आपण नको त्या वेळी नको त्या गोष्टींना अतिमहत्त्व देत असतो. घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख उगाळत बसतो. नियतीवर आपली हुकूमत चालत नाही, याचे उदाहरण देताना ते म्हणाले की इंदिरा गांधी यांच्या वैमानिक मुलाचा राजकारणात तर राजकारणातील मुलाचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. आपला प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. अंडे जेव्हा आतून फुटते तेव्हा नवा जीव जन्माला येतो, तर अंडे बाहेरून फुटते तेव्हा एक जीव मृत्युमुखी पडतो. कर्तृत्व आणि चारित्र्य या गोष्टी कोठेही विकत मिळत नाहीत. कर्तृत्व कसे असावे, हे पटवून देण्यासाठी सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण दिले. जो सचिन दहावीला नापास झाला, त्याचा धडा आत्ताच्या दहावीच्या पुस्तकात सर्वप्रथम आहे. नियती आणि नशीब यासंदर्भात बोलताना त्यांनी महाभारताचा उल्लेख केला. विचार बदला, सितारे बदल जायेगे हे कृष्णशिष्टाईतून सप्रमाण सिद्ध केले. आयुष्याकडे तक्रार करून चालत नाही. ज्यांना आयुष्य खूप सुंदर आहे हे कळते, त्यांना ती कविता वाटते. माणसाचा स्वभाव माणसाने काय आत्मसात केले, यावरून ठरतो. कोंबाची लवलव सांगे मातीचे मार्दव हा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत त्यांनी उद्धृत केला. ज्यांना स्टेजवर चांगले बोलायच आहे त्यांनी घरी गप्प राहत जावे, असा मिश्कील सल्लाही त्यांनी दिला.
(प्रसाद कुलकर्णी, लांजा)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड