स्वप्नवासवदत्तम् – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१३ मार्च २०२२) – स्वप्नवासवदत्तम्
सादरकर्ती संस्था – अस्तित्व मेकर्स फाउंडेशन,सोलापूर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १३ मार्च २०२२ रोजी स्वप्नवासवदत्तम् हे नाटक सोलापूर येथील अस्तित्व मेकर्स फाउंडेशन ,सोलापूर या संस्थेने सादर केले. या नाटकाचे लेखन सुहास वाळुंजकर यांनी केले असून दिग्दर्शन बळवंत जोशी यांचे आहे.

‘स्वप्नवासवदत्त’ नावाचे मूळ संगीत नाटक श्रेष्ठ संस्कृत नाटककार भास याने लिहिलेल्या १३ नाटकांपैकी एक आहे. काव्य आणि शब्दप्रतिभेचे तसेच कथाकल्पनेचे एक मूर्त असे अद्भुत रूप म्हणून या नाटकाकडे पाहिले जाते.

हे नाटक अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूच्या वंशात जन्मलेला कौशांबीचा राजा उदयन याच्या कथेवर आधारलेले आहे. भासाने स्वप्नवासवदत्त नाटकाच्या अगोदर ‘प्रतिज्ञायौगन्धरायण’ हे नाटक लिहिले होते. त्यात वासवदत्ता आणि उदयन यांचे प्रेम जुळते. उदयन राजा वासवदत्तेला वीणावादन शिकवतो आणि उदयन वासवदत्तेला घेऊन वासदेशावर जातो, इथपर्यंतचा कथाभाग आहे. प्रतिज्ञायौगन्धरायण हे नाटक जेथे संपते, त्याच ठिकाणी स्वप्नवासवदत्त या नाटकाची सुरुवात होते. अस्तित्व मेकर्सने सादर केलेले नाटक सुहास वाळुजकर यांनी लिहिले असून मूळ दोन्ही नाटकांमधील कथाभाग एकत्र करून हे दोन अंकी नाटक त्यांनी लिहिले आहे.

उदयन राजा वत्स देशावर राज्य करीत असतो, जवळच असलेल्या अवन्ती नगरीची राजकन्या वासवदत्ता हिच्याशी उदयनचा प्रीतीविवाह घडून येतो. वासवदत्तेवर उदयनाचे निस्सीम प्रेम असते. उदयन राजा कलाविकास, शिकार यासह काळ घालवीत आनंदाने राहात असताना आरुणी नावाचा एक शत्रू वासदेशावर आक्रमण करतो. या आपत्तीतून सुटण्यासाठी शेजारच्या मगध देशाच्या राजाचे साहाय्य मिळवायचे आणि दोघांनी मिळून आरुणीचा पराभव करायचा, हा एकच उपाय असतो. हे साहाय्य मिळविण्यासाठी मगध देशाच्या राजाची बहीण पद्मावती हिचा उदयनाशी विवाह होणे आवश्यक होते. पण वासवदत्तेवर उदयनचे विशुद्ध प्रेम पाहता तो पद्मावतीशी विवाह करण्यास तयार होणे शक्य नसते. उदयनचा एकनिष्ठ आणि चतुर मंत्री यौगंधरायण मुत्सद्देगिरीने व्यूह रचतो आणि नाटकाच्या कथेतील रंजकता वाढते. उदयन शिकारीसाठी ‘लावाणक’ गावी आपल्या राजवाड्यात राहून शिकारीला जाई. त्या वेळी बरोबर वासवदत्ताही असे आणि मंत्री यौगंधरही. राजा शिकारीला निघून गेला, की मध्यरात्री लावाणक गावातल्या त्या राजवाड्याला आग लावायची आणि यौगंधरायण व वासवत्ता यांनी वेषांतर करून गुप्त मार्गाने राजवाड्याच्या बाहेर पडायचे आणि गावात अशी वार्ता पसरवायची, की वासददत्ता या भीषण आगीत जळून मेली. तिला वाचवताना यौगंधरही आगीतच मृत्युमुखी पडला. वासवदतेच्या मृत्युने शोकाकूल झालेला उदयन पद्मवतीशी विवाह करायला तयार होईल, अशी ती व्यूहरचना होती. त्यानुसार सारे घडते. यौगंधरायण अनेक युक्त्या योजून, उदयनाने पद्मावतीशी विवाह करावा, ही भूमिका तयार होते. उदयन स्वेच्छेने नाही, तर जुलमाने आणि केवळ राज्यावरील संकट दूर व्हावे म्हणूनच पद्मावतीशी विवाह करायला तयार होतो; पण विवाह झाल्यावर वासवदत्तेची स्मृती त्याला अखंडपणे जाणवते. उदयनने ज्या वीणेवरून वासवदत्तेला वीणावादन शिकविले ती ‘घोषवती वीणा’ सापडल्यापासून उदयनाच्या मनात वासवदत्तेविषयीचे विचार सारखे डोकावू लागतात. अशा स्थितीत वासवदत्तेच्या आईकडून उदन आणि वासवदत्तेची तसबीर येते. ती पाहताच आपल्याजवळ दासीच्या रूपात असलेली अवंतिका आणि तसबिरीतील वासवदत्ता यांच्यामध्ये असलेले कमालीचे साम्य पद्मावतीच्या ध्यानात येते आणि ती वासवदत्तेला राजासमोर घेऊन येते. आणि उदयन व वासवदत्तेची अखेर भेट होते.

लेखक : सुहास वाळुजकर

संगीत दिग्दर्शक : डॉ. शशिकला शिरगोपीकर
दिग्दर्शक : बळवंत जोशी
साथीदार :- पवन व्हनकडे (तबला)
विजय रानडे (ऑर्गन)

भूमिका आणि कलावंत :
उदयन : बळवंत जोशी
वासवदत्ता : स्नेहल जोशी
पद्मावती : वैष्णवी व्हनकडे
लवंगिका : पूजा दंदाडे
वसंतक : पंकज स्वामी
परिपार्श्वक व कंचुकी : आयुष लोकरे
योगन्धारायण : सिद्धांत जेऊरे
स्नातक व प्रतिहारी : प्रशांत सोनवणे
प्रतिहारी व कंचुकी : मनमोहन भोसले
महादेवी : सुप्रिया ठाकर
प्रद्योत महासेन (उज्जयिनीचे सम्राट) : डॉ. सिद्धार्थ तळभंडारे
महाराणी अंगारवती व धात्री वसुंधरा : रेवती क्षीरसागर
कांचनमाला : अस्मिता गायकवाड
शालंकायन : वरुण नरोळे

संगीत साथीदार : सोमनाथ लोखंडे, अशपाक नदाफ
नेपथ्य : तिपय्या हिरेमठ, ओंकार साठे
रंगभूषा : राधिका देवळे, पल्लवी चोरे
वेशभूषा : मंजूषा देशमुख, अर्चना बिराजदार
प्रकाशयोजना : नितेश फुलारी
साथीदार : किरण लोंढे, केदार देशमुख, मलसिद्ध देशमुख, अमृत, गणेश मरोड

नाटकातील काही दृश्ये :

या नाटकाचा काही अंश आणि गीते :


स्पर्धेचे वेळापत्रक

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply