सेरेब्रल पाल्सीची शिकार झालेल्या प्रगतीला अजूनही खूप शिकायचंय

रत्नागिरी : घरी सर्व कामे करणाऱ्या तरुणीला मेंदूवरील शस्त्रक्रियेमुळे कमरेखाली अपंगत्व आले. ती फिरायची बंद झाली, ती अंथरुणाला खिळल्यामुळे तिच्यासह आई-वडील, कुटुंबीय पार कोलमडून गेले. मुंबईत फिजिओथेरपीनंतर थोडी सुधारणा झाली. प्रगती विजय गुरव (रा. देवधे, लांजा) नावाच्या सेरेब्रल पाल्सीची शिकार झालेल्या या तरुणीला अजूनही खूप शिकायचे आहे. तिला आता रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला व्हीलचेअर देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. मात्र समाजानेही तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला मदत करावी, असे आवाहन फाउंडेनशनने केले आहे.

जन्मत:च प्रगतीच्या तिच्या डोक्यामागील भाग मऊ होता. तिला त्याचा काहीच त्रास नव्हता, ती घरातील सर्व कामे करत होती. जेवण बनवणे, भांडी, घासणे, विहिरीवरून पाणी आणणे, लाकडे आणणे, शेतीच्या कामात मदत करणे आदी सर्व कामे ती कोणताही त्रास न होता करत असे. पण तिच्या या आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया करायचे तिच्या नातेवाइकांनी ठरविले. त्यासाठी ते मुंबईच्या नामांकित रुग्णालयात गेले. तेथे उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या मणक्यात इंजेक्शन देऊन मणक्यातील पाणी काढण्यात आले. नंतर मेंदूवरील गाठीचे ऑपरेशन करायचे ठरले. त्यानंतर ती चांगली होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. प्रगतीने २०१७ साली दहावीची परीक्षा दिली होती. नंतर ती ऑपरेशनसाठी मुंबईला गेली. ऑपरेशन केल्यानंतर ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला कळले की तिच्या शरीराला संवेदना आहेत, पण ती उठू शकत नाही, बसू शकत नाही, तिला चालता येत नाही, एखादी हवी असणारी वस्तू ती स्वतःहून उचलू शकत नाही. हे लक्षात आल्यावर ती पूर्ण खचून गेली, आता तिला सेरेब्रल पाल्सीचे व्यंगत्व नशिबी आल्याचे सांगण्यात आले. तिच्यासोबत तिचे आई- वडीलदेखील कोलमडले.

शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गुरव कुटुंबाने परिस्थिती नसतानाही मुलीच्या उपचारांसाठी विरार येथे भाड्याने खोली घेतली. तिचे वडील गावाला तिच्या लहान भावंडांना सांभाळायला परत आले. प्रगतीसोबत तिची आई थांबली. तिला दररोज थेरपीसाठी परळला न्यावे लागत होते. तो प्रवास प्रगतीच्या आईने सहजपणे झेलला. उपचारांना थोडेफार यश आले. प्रगती दुसऱ्याच्या मदतीने उठून उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. धरून धरून चालू लागली होती. तिची सर्व काम तिची आई करायची.

प्रगतीची ही सर्व कथा कळल्यानंतर रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने (आरएचपी) प्रगतीला व्हीलचेअर द्यायचे ठरवले. विशेष म्हणजे याकरिता संस्थेचा सदस्य दिव्यांग प्रीतम कदम याची मदत झाली. त्याच्याकडे दोन व्हीलचेअर होत्या. स्वतःकडील एक व्हीलचेअर आपल्यासारख्या गरजू व्यक्तीला द्यायचे असे त्याने ठरवले होते. याकरिता त्याने ही व्हीलचेअर आरएचपी फाऊंडेशनकडे दिली. याकरिता संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांनी तिला व्हीलचेअरवर कसे बसायचे, स्वतः व्हीलचेअर कशी ढकलायची, ब्रेक कसा लावायचा, हे शिकवले. त्याचप्रमाणे प्रगतीच्या घरच्यांना व्हीलचेअर पायऱ्यांवरून उतरवायचे, चढवायचे, घराबाहेर घ्यायचे प्रशिक्षण दिले. व्हीलचेअरमुळे ती सध्या घरातल्या घरात फिरू लागली आहे. तिच्या चेहर्‍यावर आनंद व आत्मविश्वास वाढत आहे. हळुहळू बाहेरही फिरायला लागेल. तिला पुढे अजून शिक्षण घ्यायचे आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्या घरात जाण्यासाठी चिरेबंदी पाखाडी किंवा सपाटीकरणाची गरज आहे. त्यासाठी मंजूर झालेली पाखाडी विरोधामुळे बांधता आलेली नाही. त्यामुळे ही पाखाडी लवकरात लवकर होण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंचांनी लक्ष घालण्याची मागणी आरएचपी फाउंडेशनने केली आहे.

अशा प्रकारे जर अपंगत्व आलेल्या व्यक्ती असतील तर रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन, अध्यक्ष सादिक नाकाडे (94054 61545) समीर नाकाडे (94224 31881), प्रिया बेर्डे (97674 56906) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

प्रगती गुरव आणि तिचे कुटुंबीय

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply