कवितेतून प्रकट झाली अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता

तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.

राजापूर-लांजा तालुका नागरीक संघ आणि तळवडे (ता. राजापूर) येथील ग्रामवाचनालयाने तळवडे येथे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी रात्री गुरुवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीत काव्यसंमेलन रंगले. नागेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनामध्ये राजापूरचे कवी समीर देशपांडे यांनी ही कृतज्ञता-कविता सादर केली. सह्याद्रीच्या पर्वतरांगातून उगम पावून नागमोडी वळणांचा प्रवास करत खळाळत वाहत अरबी समुद्राला जाऊन पोहचणार्‍या अर्जुना नदीच्या काठावर राजापूर तालुक्यातील अनेक गावे वसली आहेत. अर्जुनेच्या सहवासामध्ये अनेक पिढ्यांनी आपली सुखदुःखे अनुभवलेली आहेत. अनेकांनी अर्जुनेच्या सहकार्याने अन् साक्षीने आयुष्याच्या प्रगती अन् विकासाची कवाडे स्वतःच उघडली. नदीनेही सढळ हस्ते राजापूरकरांच्या आयुष्याला विविधांगी नव्या दिशा दिल्या. अर्जुना नदीचा हा प्रवास आणि राजापूरकरांच्या जीवनातील तिचे महत्त्व समीर देशपांडे यांनी आपल्या कवितेतून विशद केले. ‘गाळ काढून तुला वाचवू.. शाबूत ठेवू आमची भाकर’ अशा शब्दांमध्ये लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या गाळ उपशाच्या उपक्रमाकडेही त्यांनी सार्‍यांचे लक्ष वेधले.

कविसंमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कवींनी विविधांगी विषयांवरील कवितांचे सादरीकण केले. सुमारे दीड तास ही कवितांची ही मैफील चांगलीच रंगली. मानवी स्वभाव, प्रेमवैशिष्ट्ये, घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालणारे जीवन अन् त्यातील धावपळ तसेच सामाजिक विविधांगी विषयांवर कवींनी सादर केलेल्या कवितांनी सार्‍यांचे लक्ष वेधले. विजय हटकर, विराज चव्हाण, रामचंद्र तुळसणकर, स्नेहल तुळसणकर, रामचंद्र खाडे, आशा तेलंगे, प्रिया मांडवकर, लता पाटील, आकांक्षा भुर्के, जनार्दन मोहिते, चंद्रसेन जाधव, नितीश खानविलकर, सुहास आयरे, श्रद्धा कळंबटे यांनी कविता सादर केल्या. ‘शेवटी कविता करायची राहून जाते’, ‘आई‘, ‘आई-वडील’,‘तारुण्यातील पाऊस गाणी’, ‘कन्यारत्न’, तसेच देशप्रेम आणि सामाजिक विषयांवरील कवितांचा त्या समावेश होता. ज्या गावामध्ये साहित्य संमेलन होत आहे, त्या तळवडे गावचा महिमाही कवींना यावेळी कवितेतून सार्‍यांसमोर उलगडला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply