रत्नागिरी : रत्नागिरीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज येथील पोलीस संचलन मैदानावर चौसष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजवंदन झाले.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत रायगड जिल्ह्याचेही पालकमंत्री असल्याने ते तेथील ध्वजवंदनाकरिता गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केले.
जिल्ह्यात कृषी, मत्स्यव्यवसाय तसेच पर्यटन यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि दुसरीकडे जिल्ह्याचा औद्योगिक विकास असे संतुलन साधत जिल्हयाचा विकास पुढे नेत आहोत. विकास शाश्वत असावा आणि जिल्हा प्रगत व्हावा, यासाठी प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन श्री. सिंह यांनी यावेळी केले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यात स्थानिक आणि नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात विकासाला गती देण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून २७१ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. तो संपूर्ण निधी खर्च झाला आहे. कृषी, मत्स्यव्यवसाय तसेच पर्यटनाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. चिपळूणच्या धर्तीवर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांचा गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळ काढण्यासाठी इंधनासाठी आवश्यक त्या ठिकाणी निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ११ नद्यांमधील गाळ काढण्याची कामे झाली. त्यामध्ये पाच लाख १४ हजार ९१२ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी मोठी वाव आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात १६ कोटी १२ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. भाट्ये, आरेवारे येथील समुद्रकिनाऱ्यांचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून जिल्ह्यातील इतर ठिकाणीही पर्यटक वाढविणाऱ्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. काजू बोर्डाची स्थापना झाली असून आता त्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापना व बळकटीकरण, मागेल त्याला काजू कलमे, काजू प्रक्रिया आधुनिकीकरण, काजू बोंडांवर प्रक्रियेकरिता लघुउद्योग उभारणी या सर्व बाबी अनुदानित तत्त्वावर इतर योजनांच्या निधीशी सांगड घालून राबविण्यात येत आहेत. याचाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द लाभण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना आणली. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा आपणही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न समृद्धी ही पथदर्शी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील फलोत्पादन, पशुधन विकास, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, लहान बंदरांचा विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित सूक्ष्म योजना आदींचा विकास साधता येणार आहे. राज्य शासनाने राज्यातील नागरिकांना सहज सुलभ पद्धतीने वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी आजपासून सुधारित वाळू धोरणाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निवेंडी येथे मँगो पार्क प्रस्तावित असून या माध्यमातून कोल्ड स्टोअरेज, टेस्टिंग लॅब, एक्स्पोर्ट सुविधा, प्रोसेसिंग सेंटर, ट्रेनिंग सेंटर, अॅडव्हान्स पार्किंग इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत. दापोली तालुक्यातील हर्णै बंदराजवळ मरीन पार्कसाठीची प्रक्रिया सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ४९६ गावांत एक हजार ३५३ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील ११० गावे “हर घर जल” म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी शासन स्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी व कमीत कमी कालावधीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत “जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ देणार आहेत. नागरिकांनीही या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल म्हणून तालुकापातळीवर नामनिर्देशितांचा सत्कार जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशही जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
रत्नागिरीतील महाराष्ट्र दिन समारंभाची चित्रमय झलक









