रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू होणार आहे. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांअंतर्गत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास सुरुवात केली जाणार आहे.
करिअर कट्टाअंतर्गत असणाऱ्या मोबाइल अॅपद्वारे सर्व विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या लेखी परीक्षेची तयारी करण्याचे मार्गदर्शन सत्र करिअर कट्टाकडून घेतले जाईल. तीन महिने ऑनलाइन असणाऱ्या प्रशिक्षणाबरोबरच आतापर्यंत झालेल्या भरतीपूर्व प्रशिक्षणाचा सर्व प्रश्नांचा संच ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध असेल. महिन्यातून दोन वेळेला झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने महविद्यालयामध्ये घेतली जाईल. पेपर तपासून त्याचे गुण आणि झालेल्या चुकांचे मार्गदर्शन महाविद्यालयात केले जाईल.
पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या मैदानी प्रशिक्षणाची तयारी महाविद्यालयाच्या मैदानावर करून घेतली जाईल आणि इतर साधनसामग्री महाविद्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा उपक्रमासाठी ३६५ रुपये भरून प्रवेश घेतला असेल त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची कसलीच फी असणार नाही. जे आजी-माजी विद्यार्थी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांना प्रवेश घेताना करिअर कट्टा उपक्रमाची ३६५ रुपये फी भरावी लागेल. महाविद्लयाव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश घेताना १५०० रुपये फी भरावी लागेल. भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची निवड मैदानी चाचणी, मुलाखत घेऊन केली जाईल.
प्रत्येक तुकडी १०० विद्यार्थ्यांची असेल. एका तुकडीचा कालावधी ९० दिवसांचा असेल. पहिली तुकडी ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांसाठी असेल. तिचा तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरदेखील विद्यार्थी मैदानावर सरावासाठी येऊ शकतील.
अधिक माहितीसाठी करिअर कट्टा समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे (९६५७०१५०४८) आणि प्रशिक्षक व मार्गदर्शक डॉ. विनोद शिंदे (९४२११३७४५३) यांच्याशी संपर्क करावा. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे नोंदणी अर्ज भरावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. साखळकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

