माझी वसुंधरा अभियान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे माझी वसुंधरा अभियान राबविले जाते. ग्रामीण आणि शहरी भागाकरिता हे अभियान राबविले जात आहे. नैसर्गिक परिसंस्थांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी विविध उपायांची अंमलबजावणी करणे आणि वातावरणातील बदलांच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता अभियान राबविले जात आहे. या अभियानाला स्पर्धेचे स्वरूप दिल्यामुळे गावागावांमध्ये त्यासाठी अहमहमिका सुरू आहे. अभियानातील निकष पूर्ण करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे.
सृष्टीची निर्मिती पंचमहाभूतांपासून झाली आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. त्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच घटकांचा समावेश आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि पर्यायाने बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच जगाचे आधुनिकीकरण झाले आहे. ते करताना अनेक विकासकामे केली जात आहेत. या विकासकामांमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले असले तरी पर्यावरणाचा मात्र मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. ज्यांना पंचमहाभूते असे म्हटले जाते, त्या सर्व घटकांना मानवनिर्मित प्रदूषणाने ग्रासून टाकले आहे. रासायनिक कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गोड्या आणि खाऱ्या पाण्याचे प्रदूषण होते. याच कारखान्यामुळे हवेचेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. घातक रसायनांमुळे जमीन प्रदूषित होते. मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पन्न मिळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे जमीन प्रदूषित होत आहे. वणव्यामुळे वनाच्छादित भाग दररोज घटत चालला आहे. त्याला वृक्षतोडीची जोड मिळत आहे. वायुप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाढत्या विकासाचे हे दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
यावरचा उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे उपाय जगभर सुचविले आणि योजले जात आहेत. ज्या प्रमाणात औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, ती लक्षात घेता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी योजले जाणारे उपाय अत्यंत तुटपुंजे आणि तोकडे आहेत. तरीही ते उपाय योजूच नयेत असे नाही. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी कारखानदारी प्रदूषणाला प्रामुख्याने जबाबदार आहेच, पण सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यातूनही प्रदूषण होत असते. कारखान्यांमध्ये प्रदूषणावर उपाय योजण्याचे प्रयत्न सुरू असतात, पण सर्वसामान्य माणसांनीही आपल्याकडून होणाऱ्या प्रदूषणावर मात करायचा प्रयत्न केला पाहिजे. रोजच्या जगण्यातील बदलातूनच हे शक्य आहे. सर्वसामान्य लोकांमुळे होणाऱ्या कचऱ्याची समस्या कितीतरी मोठी आहे. व्यक्तिगत स्वरूपात ही समस्या सोडविली जाऊ शकते. त्यावरचेही अनेक उपाय शोधले गेले आहेत. पण निर्ढाववलेली मानसिकता त्याकडे डोळसपणे पाहायला तयारच नाही. आपण आपल्या पातळीवर आपल्यापुरते प्रदूषण रोखू शकतो, हा विचारच जनमानसात रुजत नाही. औद्योगिकीकरणापूर्वी सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन जसे होते, तसेच्या तसे आज जगणे शक्य नाही. कारण माणसानेच अनेक आयुधे आणि उपकरणे निर्माण करून व्यक्तिगत जीवन यंत्रावलंबित करून टाकले आहे. त्यामुळे शारीरिक श्रम करायला कोणीही धजावत नाही. त्यातूनच अनेक शारीरिक व्यक्तिगत आणि सामाजिक समस्याही निर्माण होत असतात. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर याचा विचार करून पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रयत्न करायला हवा. शहरे आणि ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात आलेले माझी वसुंधरा अभियान त्यासाठी उपयुक्त आहे. मात्र त्यातील उपक्रम केवळ अभियानाच्या आणि स्पर्धेच्या वर्षापुरते राबवून काहीही उपयोग नाही. या उपक्रमांचे महत्त्व पटले असेल तर हे उपक्रम दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले पाहिजे. तरच अभियान राबविण्यात काही अर्थ आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २८ मार्च २०२५)
    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply