आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांचे मालगुंड हे गाव आता शासकीय स्तरावर पुस्तकांचे गाव म्हणून घोषित झाले आहे. मराठी भाषा आणि पालकमंत्री उदय सामंत, केशवसुत स्मारकाचे उद्गाते पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकांच्या गावाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले. कोकणाला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतील, पुस्तके वाचतील, मालगुंड आणि परिसरातील सुमारे ३५ घरांमध्ये ही पुस्तके ठेवली जाणार असल्याने त्या त्या घरांमध्ये पर्यटक पोहोचतील, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मोहक चित्र निर्माण करण्यात आले आहे. ते खरोखरच प्रत्यक्षात आले तर कितीतरी गोष्टी साध्य होतील. मात्र त्याचे संपूर्ण आणि अचूक नियोजन होणे आवश्यक आहे.
पर्यटकांनी पुस्तकांच्या या गावाला भेट द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जवळच्या श्रीक्षेत्र गणपतीपुळ्याला भेट देणाऱ्यांपैकी अनेक पर्यटक मालगुंड गावालाही भेट देतात. त्यांच्यासाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा उपलब्ध करण्याची ही योजना आहे. पण कोकणात येणारे पर्यटक केवळ गणपतीपुळ्यालाच येतात, असे नाही. संपूर्ण कोकणातील प्रत्येक गाव पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले जाते. तसेच निसर्गसौंदर्य प्रत्येक गावाला मिळाले आहे. मात्र पर्यटक प्रत्येक गावाला भेट देईलच, अशी शक्यता नाही. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली अनेक गावे कोकणात आहेत. कातळखोदशिल्पांसारखा प्रागैतिहासिक ठेवाही कोकणात मोठ्या प्रमाणावर आहे. रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, गोवा किल्ला, आंबोळगडासारखे असंख्य किल्ले कोकणात आहेत. पुरातन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरेही गावांमध्ये आहेत. या गावांना पर्यटक भेटी देत असतात. पण त्या स्थळाविषयीची माहिती त्यांना एकत्रितरीत्या उपलब्ध होत नाही. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात ही माहिती पर्यटक वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवत असतात. मात्र ती सर्व माहिती अचूक असेलच असे नाही. अनेक वेळा गैरसमजही निर्माण होत असतात. ते पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे कोकणाचे आकर्षण असले तरी पर्यटकांना योग्य माहिती मिळू शकत नाही.
मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या गावाच्या पुढाकाराने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. ज्या गावांना पर्यटक भेटी देत असतात, त्या गावांमधील ऐतिहासिक, पौराणिक ठिकाणांची योग्य ती माहिती संकलित केली पाहिजे. त्याविषयीची पुस्तके आधीच प्रसिद्ध झाली असतील तर ती त्या त्या ठिकाणच्या गावांमधील वाचनालयामध्ये, संबंधित ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजेत. आधी पुस्तके तयार झाली नसतील तर संदर्भासह नव्याने पुस्तके लिहिली गेली पाहिजेत. या पुस्तकांचा संग्रह त्या त्या गावांमध्ये उपलब्ध करून दिला पाहिजे. या साऱ्याचे नियंत्रण पुस्तकांच्या गावाने करायला हवे. तशी यंत्रणा उभारली गेली पाहिजे. पुस्तकांच्या मालगुंड गावाला भेट दिल्यानंतर त्यांना कोकणातील इतर ठिकाणी कोणकोणती स्थळे आहेत, त्यांचे संदर्भ काय आहेत, कोणत्या गावात गेल्यानंतर त्या गावांच्या वैशिष्ट्यांची परिपूर्ण माहिती कोणत्या वाचनालयांमध्ये उपलब्ध होईल, त्याविषयी माहिती देणारे स्थानिक गाइड कोणत्या गावात आहेत याची जंत्रीही पुस्तकांच्या गावाने संकलित करायला हवी. शासनाच्या पुढाकाराने एका गावाची पुस्तकांचे गाव म्हणून निवड झाली असली तरी ते प्रातिनिधिक स्वरूपाचे काम आहे. अन्य गावांनी त्यापासून प्रेरणा घेऊन आपापल्या गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधायला हवा. पुस्तकांच्या माध्यमातूनही तो होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तसा आराखडा तयार करायला हवा. तो अमलात आणायला हवा. त्या अर्थाने प्रत्येक गावच पुस्तकांचे गाव व्हायला हवे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २५ एप्रिल २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

