शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे उदय सामंत यांचे निर्देश

रत्नागिरी : बँकेचे शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करत असतील, तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (२८ जून) संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांच्या अडी-अडचणींसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना आणि आंबा बागायदारांना भरपाई मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह एकत्रित बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीला सहकारमंत्र्यांनाही निमंत्रित करू, असं आश्वासन सामंत यांनी दिलं. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

ग्राममहसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत आज रत्नागिरीत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचं वितरण करण्यात आलं. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह ई-फेरफार प्रणाली वापरकर्त्यांना अभिलेखांचं संगणकीकरण करणं सोपं होणार आहे. या वेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply