राजापूर, चिपळूणमध्ये पूरस्थिती; ताजे तपशील

रत्नागिरी : सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस कोसळत असल्याने (१९ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्हा पोलीस दलासह सर्व यंत्रणा काल रात्रीपासून पूरस्थिती हाताळत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे चिपळूण-खेडच्या दौऱ्यावर आहेत. अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी राजापूरच्या दौऱ्यावर आहेत. खेडमधली जगबुडी नदी धोका पातळीच्या वरूनच वाहत आहे. वाशिष्ठी, काजळी, कोदवली, बावनदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत.
अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पूर आल्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलं आहे. कोल्हापूर मार्गावरच्या अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवली आणि मार्ग सुरू केला. राजापूर शहरात जवाहर चौक खडपेवाडी परिसर, मासळी मार्केट परिसर व वरचीपेठ परिसर, तसंच समर्थ नगर (भटाळी) व कोंडेतड ब्रीज या ठिकाणी पाणी आलं आहे. सर्व नागरिक व व्‍यापारी यांना सूचना देऊन त्‍यांचं सामान दुकानातून हलवण्यात आलं आहे. कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. स्‍थानिक रहिवासी आणि दुकानदार यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. नगर परिषदेची सर्व यंत्रणा कार्यरत आहे. आपत्कालीन बोट सज्ज आहे. व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सावध राहण्याबाबत नागरिकांना दर १० मिनिटांनी नियंत्रण कक्षातून स्पीकरवरून सूचित करण्यात येत आहे. त्‍याचप्रमाणे सायरनही वाजवण्यात येत आहे, असं प्रशासनाने कळवलं आहे.
– चिपळूणच्या कोळकेवाडी धरण परिसरात २४ तासांमध्ये २२० मिलिमीटर पाऊस पडला असून, सकाळी भरती होती त्यामुळे चिपळूण शहराच्या मुरादपूर, वडनाका, पेठमाप आदी भागांमध्ये एक-दीड फूट पाणी शिरलं आहे. नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफ यांची पथकं ११ ठिकाणी तैनात करण्यात आली असून, पाच ठिकाणी बोटी ठेवण्यात आल्या आहेत. आणखी आठ तास नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिल्या आहेत.
– चिपळूणच्या सखल भागातला वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
– चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते गावात सखल भागात पाणी आल्याने पाच कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं असून, जुवाड बेटावरच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. खेर्डी ते हेळवाक वाहतूक सुरू झाली आहे.

– चिपळूणमधल्या पूरस्थितीमुळे ३१ कुटुंबांतल्या ७६ व्यक्ती आपल्या दुसऱ्या घरी किंवा नातेवाईकांकडे स्थलांतरित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यात जुवाड बेटावरच्या २२ कुटुंबांतल्या ५१ व्यक्ती, कळंबस्ते इथल्या सात कुटुंबांतल्या १८ व्यक्ती आणि पिंपळीतल्या दोन कुटुंबांतल्या सात व्यक्तींचा समावेश आहे.
– हेळवाक येथे रस्त्यावर पाणी साचल्याने हेळवाक-कराड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
– मिरजोळीमध्ये गुहागर रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे.
– कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
– मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
– रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन हरचिरी, चांदराई, सोमेश्वर या गावांमध्ये पुराचं पाणी भरलं होतं. मार्गावरील पुलावर पुराचं पाणी आल्याने पोलीसांमार्फत सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आली होती. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

– वाटूळ (राजापूर) मांडवकरकरवाडी सौंदळ फुफेरे आंगले रस्त्यावरील (प्रजिमा 70 कि. मी 8/300 causeway) पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply