रत्नागिरी : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून चौथ्या सागर महोत्सवातील विविध कार्यक्रम सुरू होणार आहेत. जबाबदार पर्यटन हा मुद्दा लक्षात घेत पथनाट्ये आणि सागरी किल्ल्यांचा वनस्पती, प्राणिजीवनाचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांपासून आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीत सागर महोत्सव साजरा होत आहे. केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर सागर आणि त्याच्या परिसंस्थेची जाणीवपूर्वक ओळख करून देणारा आणि त्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले टाकणारा उपक्रम म्हणून हा महोत्सव खूप आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, पृथ्वीचा ७५ टक्के भाग विविध सागरांनी व्यापलेला आहे. सागर ही केवळ जलराशी संग्राहक नव्हे, तर तो कार्बन शोषून घेणारा आणि प्राणवायू निर्माण करणारा एक महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. तो मत्स्यव्यवसाय, जहाजवाहतूक आणि विविध प्रकारच्या रोजगारांच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना पोसतो. आज सागर महोत्सवाचा आवाका वाढत आहे, त्याची पोहोच विस्तारत आहे आणि त्याचा दर्जाही उंचावत आहे.
यावर्षी ऑक्टोबर–नोव्हेंबरपासून सुरू होऊन महोत्सवात सागर आणि निसर्ग सान्निध्यात ‘जबाबदार पर्यटन’ या विषयावर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. जंजिऱ्यापासून उत्तरेकडील उंदेरी, खांदेरी, कुलाबा (अलिबाग), जंजिरा, पद्मदुर्ग, अर्नाळा या सहा सागरी किल्ल्यांवर पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमधील सागरी वनस्पती आणि प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही सागरतज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने, पुळणी व खडकाळ किनाऱ्यांच्या अभ्यास फेऱ्या, खारफुटीच्या परिसंस्थेची सहल आणि महाविद्यालयीन स्पर्धा व उपक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सागर जसा आहे तसा जरी टिकवता आला, तरी ती मोठीच गोष्ट ठरेल. कारण सागरात अशी शक्ती आहे की तो क्षणात संपूर्ण पृथ्वीला आपल्या कवेत घेऊ शकतो, हे जाणून, त्याच्याशी सन्मानाने, जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने वागणे अत्यावश्यक आहे. सागर महोत्सव फक्त एक उपक्रम नाही, तर भविष्यासाठी एक संकल्प आहे. सर्वांनी सहभाग घेऊन सागराची जपणूक करावी, असे आवाहन आसमंत फाउंडेशनने केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

