सावंतवाडीत स्वच्छतेसाठी ज्येष्ठ नागरिकाचा एक रविवार एक किलोमीटर उपक्रम

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेसाठी डॉ. मधुकर एका ज्येष्ठ नागरिकाने एक रविवार एक किलोमीटर स्वच्छता असा उपक्रम हाती घेतला आहे. तो उपक्रम उद्या (दि. १३ डिसेंबर) पार पडणार आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर डॉ. घारपुरे छोट्या मोठ्या सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. आधी केले मग सांगितले, या वृत्तीने कोणत्याही सुधारणा स्वतःपासून करायचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेचा विषय हाती घेतला आहे. उद्या सकाळी ८ वाजता ते सावंतवाडीतील स्वतःच्या घरासमोरील एक किलोमीटर रस्त्याच्या कडेच्या गटारातील प्लास्टिक बाटल्या, अन्य प्लास्टिक जमा करणार आहेत. त्यांचा हा माझा स्वेच्छा उपक्रम आहे. या उपक्रमाबाबत ते म्हणाले, सावंतवाडी शहरात सुमारे ६० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. माझ्या उपक्रमात ६० स्वच्छताप्रेमी नागरिक आपल्या जवळचा एक किलोमीटर रस्ता स्वच्छ करण्याच्या उपक्रमात सहभागी झाले, तर अर्ध्या तासात शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होतील. दर रविवारी नागरिकांनी असा उपक्रम राबविणे मला अपेक्षित नाही. मीही तसे करणार नाही. नागरिक गटारात वा रस्त्याच्या कडेला बाटल्या फेकतात आणि सफाई कर्मचाऱ्यांना तेथील सफाई करणे शक्य नाही. मुळात किमान कचरा निर्मिती आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली, तर अशा उपक्रमाची गरज पडणार नाही. सावंतवाडीतील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी त्यांना नेमून दिलेले काम करत असतात. नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी असते, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी मी रविवारचा उपक्रम प्रातिनिधिक स्वरूपात राबवत आहे, असेही ते म्हणाले.

याबाबत काही सूचना असल्यास तसेच जे नागरिक स्वेच्छेने यात सहभागी होतील त्यांनी आपली नावे ९४२२३८१७८० या आपल्या क्रमांकावर कळवावीत, असे आवाहन डॉ. घारपुरे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply