कृषी कायद्यांवरून अराजक माजविण्याचा प्रयत्न : चित्रा वाघ

रत्नागिरी : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडायला तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून केंद्र सरकार चर्चा करीत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत आल्यावरही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने अनेकदा चर्चेचे प्रस्ताव पाठवले. प्रत्यक्ष चर्चेत संघटनांच्या नेत्यांच्या मनात असलेल्या शंका दूर व्हाव्यात यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचीही तयारी दर्शविली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या संघटनांचे नेते आपला हेका सोडायला तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना कृषी कायद्याच्या निमित्ताने केवळ राजकारण करायचे आहे, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

किमान आधारभूत किमतीने केंद्र सरकारकडून अन्नधान्याची खरेदी यापुढेही चालू राहणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. तसे लेखी आश्वासन देण्याची तयारीही केंद्र सरकारने चर्चेवेळी दाखविली आहे. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्थाही कायम राहणार आहे. शेतकऱ्यांना बाजार समित्यांबरोबर आपल्या शेतमालाच्या विक्रीचा आणखी एक पर्याय उपलब्ध राहणार आहे. शेतकरी त्याच्या पसंतीनुसार आपला शेतमाल कोठेही विकू शकेल. तसेच कंत्राटी शेतीबाबतचे गैरसमजही केंद्र सरकारने दूर केले आहेत. असे असताना कायदे रद्दच करा, या मागणीवर संघटनांचे नेते अडून बसले आहेत. या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचे आहेत,. या कायद्याचे फायदे सामान्य शेतकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकरी या कायद्याविरोधात सुरू असलेल्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. ऐश्वर्या जठार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, शहरध्यक्ष सचिन करमकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी, प्रभारी विजय सालीम आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कायद्यासंदर्भात चर्चासत्र : नारायण राणे

दरम्यान, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या तीन कृषिविषयक कायद्यांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे चर्चासत्र लवकरच आयोजित केले जाईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांची आज सिंधुदुर्गनगरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने कृषीविषयक सुधारणा घडविणारे तीन कायदे आणले आहेत. त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, या कायद्यांचा हेतू या देशातील शेतकरी समृद्ध व्हावा हाच आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा पंतप्रधनांचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात तयार केलेला आपला माल कोठेही मुक्तपणे विकतील, बाजार भाव ठरवतील. जेथे जास्त फायदा मिळेल, तेथे शेतकरी आपला माल विकेल. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे भाव मिळेल. त्यामुळे त्यांचा अधिक आर्थिक फायदा होईल. दलाल पद्धत रद्द होईल आणि अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. त्यासाठीच “एक देश एक बाजार” हा मंत्र घेऊन मोदींनी ही योजना सुरू केली आहे. विरोधक मात्र या कायद्यांच्या बाबतीत अफवा आणि गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास शून्य आहे. गेली ७० वर्षे राज्य करणाऱ्यांनी असे कायदे का आणले नाहीत? ते त्यात अपयशी ठरले आहेत.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सरकारने बोलावले आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकी कशावर चर्चा होणार, हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांना अधिवेशन नको, कॅबिनेट मीटिंग नको. कारण ते महाराष्ट्राची परिस्थिती हाताळू शकत नाहीत, निर्णय घेऊ शकत नाही. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना जिल्ह्याबद्दल आस्थाच नाही ते जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अपयशी ठरले आहेत, असेही श्री. राणे म्हणाले.

करोनाच्या बाबतीतही राज्य सरकार अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, करोनाचे ४८ हजार मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले. हे या सरकारचे दुर्दैव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ मी आणला आहे. तो अधिकृतपणे लवकरच आम्ही सुरू करणार आहोत, असेही ते म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply