पालघर जिल्ह्यातील `श्रीमंत` शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याचे आदेश

पालघर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनुसार अनेक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. मात्र योजनेतील निकषात न बसलेल्या, तसेच निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असून आयकर भरणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनुदान परत केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनुसार (PM KISAN) लाभ घेतलेले पालघर जिल्ह्यातील एक हजार ७७३ योजनेला अपात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यावर चार हजार ६१७ हप्यांमधून जमा झालेली ९२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम शासनाला परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ यांनी दिले आहेत. त्यापैकी २३९ शेतकऱ्यांनी एक हजार १३१ हप्त्यापोटी २२ लाख ६६ हजार रुपये शासनाला परत केले आहेत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या पालघर जिल्ह्यातील एक हजार ४६३ आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार ९२६ हप्ते जमा झाले. त्याद्वारे एक कोटी ३८ लाख ५२ हजाराची रक्कम शासनास परत करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार त्यापैकी १८७ शेतकऱ्यांनी ९०४ हप्त्यांमधून १७ लाख ९६ हजार रुपये शासनास परत केले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील पाच हजार ५०१ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी (Physical Verification) करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार २०४९ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण झाली असून राहिलेल्या ३४५२ लाभार्थ्यांची भौतिक तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना दिले आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply