खेड : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून हेदली (ता. खेड) गावातील घराघरांमध्ये सावित्रीबाई फुले पुस्तकांचे वाटप आज समारंभपूर्वक करण्यात आले.
खेड तालुक्यातील हेदली गाव हे पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचे केंद्र समजले जाते. महापुरुषांच्या विचाराने चालणाऱ्या या गावाची वाटचाल त्यांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. महापुरुषांच्या जयंती साजरी करणारे गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे. जय हनुमान मित्र मंडळाने गावात आज पुस्तक वाटपाचा कार्यक्रम केला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर म्हणाले, जयंती ही विचारांची आणि आदर्शांची व्हावी, हाच आदर्श जय हनुमान मित्र मंडळाने सावित्रीबाई फुले यांची पुस्तके देऊन समाजापुढे निर्माण केला आहे.
यावेळी प्राथमिक शिक्षिका कांबळे म्हणाल्या की, मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे, ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. त्यांनी शाळा काढली नसती, तर मी शिकले नसते. या गावातील महिला सावित्रीबाई फुले यांच्यासारखा गणवेश परिधान करत असल्याचे पाहून मी भारावून गेले. असा सावित्रीबाई फुले उत्सव सर्व गावांत होणे गरजेचे आहे.
श्रुती पाकतेकर म्हणाल्या की, पुस्तकांनी मस्तक सुधारते. त्यासाठी घरोघरी पुस्तक पोहोचवण्याचे काम जय हनुमान मित्र मंडळाने केले आहे.
अंनिसच्या खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण दिले. त्यामुळे आज शिकलेल्या स्त्रिया अनेक पदांवर विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, कलेक्टर, झाल्या आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे स्मरण केले पाहिजे.
कार्यक्रमाला अंनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर, गांगरकर गुरुजी, माजी सरपंच संजय गोवळकर, अंगणवाडी शिक्षिका किशोरी गायकवाड, अर्चना माजी सरपंच स्मिता चिनकटे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुगंधा चिनकटे, आरोग्य सेविका सारिका गोवळकर, आदर्श माता पुरस्कार प्राप्त सुलोचना गोवळकर, जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक मेंगडे, मनीवाइज अर्थिक सारक्षता केंद्रप्रमुख मधुकर माळचे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव संदीप बंडबे यांनी केले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
