महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरीच्या सभेत डॉ. सुभाष देव यांनी सांगितला किस्सा
रत्नागिरी : भारतरत्न पं. भीमसेन जोशी मंडईतील हमाल, कष्टकऱ्यांसाठीही गायनाचा कार्यक्रम करत. कार्यक्रम मोफत असला तरीही त्याचा दर्जा उत्तम असायचा. एका कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे एक हमाल त्यांना म्हणाला, भीमप्पा, `तीर्थ विठ्ठल तेवढा छान झाला नाही!
` मग भीमसेनजींनी वादकांना पुन्हा वाद्ये जुळवायला सांगून पुन्हा तोच अभंग तासभर म्हटला. तो रसिक खूष झाला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी हा किस्सा सांगितला. निमित्त होते मसापच्या रत्नागिरी शाखेने आज, रविवारी १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या साहित्य सभेचे. सभेला रत्नागिरीतील साहित्यरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. नाट्य अभिवाचन, कविता सादरीकरण, लेखाचे अभिवाचन असे कार्यक्रम यावेळी पार पडले. पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात कार्यक्रम झाला.

हमालासाठी पुन्हा अभंग म्हटल्याचा संदर्भ पं. जोशी यांच्या चरित्रात असल्याचे डॉ. देव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असतात. हळूहळू साहित्यिक, रसिक येऊ लागतील. वेळेवर कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून यापुढे दरमहा एक कार्यक्रम करणार आहोत. आषाढी एकादशी वारी नसली तरी करोनाकाळात विठुरायाने केलेल्या मदतीची कलाकार संकर्षण कऱ्हाडे याची कविता त्यांनी यावेळी ऐकवली.
कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात करोना महामारीमुळे आपण आभासी दुनियेत जगू शकत नाही, हे वास्तव लोकांना कळले. पुस्तकातील अक्षरे आणि बोललेले शब्द यांचे महत्त्व भरपूर आहे. याकरिता दरमहा कवी, लेखक, संवाद साधायचा, कार्यक्रम करायचे ठरवले आहे. चांगले कार्यक्रम करत राहिलो तर गर्दी जमेल, असेही ते म्हणाले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. ज्येष्ठ लेखिका श्रीमती सुजन शेंडे यांनी स्वलिखित ललितलेखांचे वाचन केले. कलाकार महेंद्र पाटणकर आणि सौ. पूर्वा खालगावकर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर लिखित संन्यस्त खड्ग
नाटकातील एका प्रवेशाचे सुरेख वाचन केले. ऋता पाटणकर यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले.

सूत्रसंचालन आसावरी शेट्ये यांनी केले. सुनील बेंडखळे यांनी आभार मानले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media

One comment