नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक, सिंधुदुर्गात दंडवसुली, कणकवलीत कंटेन्मेंट झोन

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांत आज नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ फेब्रुवारी) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले, तर २८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ५ रुग्ण आढळले आणि ८ जण करोनामुक्त झाले.

सिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. रुग्णांची संख्या वाढल्याने कणकवली तालुक्यात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत २, खेडमध्ये १, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले. (एकूण ९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि खेड तालुक्यात प्रत्येकी २ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९८८३ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७७ हजार ७२० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३७ आहे. त्यातील प्रत्येकी २५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आणि कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २८ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९३५६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यातील ६९ वर्षीय महिला आणि खेड तालुक्यातील ४८ वर्षी पुरुष रुग्णाची करोनाविरुद्धची लढाई काल अयशस्वी ठरली. त्यांची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६४ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६८ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ५ करोनाबाधित आढळले, तर ८ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४०५ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०४३ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

विनामास्क फिरणाऱ्या ३९७ जणांना दंड

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ३९७ व्यक्तींना मास्क वापरला नसल्याने दंड करण्यात आला.

महसूल विभागाने काल एका दिवसात ४१ व्यक्तींवर कारवाई करन ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी १७६ व्यक्तींवर कारवाई करत ३५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. नगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक १८० व्यक्ती विनामास्क आढळून आल्या. त्यांच्याकडून ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ७९ हजार ४०० रुपये आहे.

जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण १२६ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १४ ठिकाणी करोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये ४ रेस्टॉरंटचाही समावेश आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझर वापरावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

कणकवली तालुक्यात तीन कंटेन्मेंट झोन

कणकवली तालुक्यात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. ते असे – मौजे कासार्डे आनंदनगर येथे ४ मार्चपर्यंत, मौजे खारेपाटण, रामेश्वरनगर आणि मौजे कुरंगवणे येथे २८ फेब्रुवारीपर्यंत. या कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर केलेल्या मुदतीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply