वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे कर्मचारी कारवाईच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण एक लाख ८१ हजार ९९४ ग्राहकांकडे ८३ कोटी चार लाखाची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून होळी, रविवार किंवा सणाची कोणतीच सुट्टी न घेता येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व वीजबिल भरणा केंद्रावर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

गेले वर्षभर करोना आपत्तीत भरडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महावितरण कंपनीने जुलैपासून बिल हप्त्याने भरायची सवलत दिली, अतिरिक्त सवलतदेखील दिली. त्यानंतरही वीज बिलाबाबत शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने अनेक मेळावे आयोजित केले. तरीही महवितरण कंपनीच्या थकाबाकीत वाढच झाली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या काळात ग्राहकांना हप्ते पद्धतीने बिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा अधिकार देण्यात आला होता. परंतु अनेक ठिकाणी ग्राहकांची थकबाकी वसूल झाली नसल्याचे वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना पुरेशा प्रमाणात माहिती देणे, थकीत रक्कम वेळोवेळी भरून घेणे याबाबत कुचराई केली आहे का, याबाबत तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीचे वाढीव प्रमाण असलेल्या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आता कठोर कारवाई होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोकण प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी दृक्श्राव्य आढावा बैठक घेऊन कोकण परिमंडळातील वाढत्या थकबाकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८६ हजार ३९६ वीज ग्राहकांकडून ४४ कोटी २३ लाख, तर रत्नागिरी जिल्ह्यातील ९५ हजार ५९८ ग्राहकांकडून ३८ कोटी ८१ लाखाची रक्कम थकीत आहे. त्याअनुषंगाने कोकण परिमंडळाचे रत्नागिरीतील मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तर दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील थकबाकी परिस्थितीबाबत उपविभागनिहाय आढावा प्रत्येक ठिकाणी भेट देऊन घेतला. यावेळी अनेक ठिकाणी महावितरण कंपनी कर्मचारी थकबाकीदार ग्राहकापर्यंत पोहोचले नसल्याची बाब लक्षात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीजग्राहक बिल भरण्याची तयारी दाखवत असूनही तशी व्यवस्था करण्यात कर्मचाऱ्यांनी कसूर केली आहे का, याचा अहवाल मागवण्यात येत आहे. याशिवाय थकबाकीदार वीजग्राहकांची थकबाकी वसूल न करता अथवा हप्ता न भरता वीजपुरवठा सुरू असल्यास त्याबाबत संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आल्याचे समजते.

त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुट्टीच्या काळातही बिल भरणे शक्य व्हावे, यासाठी सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply