कर्णबधिर बालकांच्या पुनर्वसनासाठी हवे आहेत स्वयंसेवक

रत्नागिरी : पुण्यातील हिंदुराज मित्र मंडळ या नामवंत सेवाभावी संस्थेने दापोलीत काम कर्णबधिर बालकांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले असून त्याकरिता स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. समाजातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एक हजार मुले जन्माला आली तर त्यातील चार मुले जन्मजात कर्णबधिर असतात, अशी जागतिक आकडेवारी आहे. ऐकण्याचे वैगुण्य सोडल्यास ही मुले शरीराने आणि बुद्धीने इतर मुलांसारखी असतात. पण ऐकू न आल्यामुळे त्यांना बोलत येत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे मार्ग बंद होतात. शिक्षण नसल्यामुळे उपजीविकेचे साधन नाही. अर्थप्राप्ती नाही. त्यामुळे लग्नासाठी जोडीदार मिळणेही अवघड होते. वाचा भाषा नसल्यामुळे समाजात मिसळता येत नाही. हुशार आणि धट्टीकट्टी असलेल्या या सर्वांची ही दुर्दशा त्यांच्या मृत्यूपर्यंत तशीच राहते. अशी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती बऱ्याच वेळा मानसिक नैराश्याने ग्रस्त होतात. हे सर्व टाळता येऊ शकते. या मुलांना श्रवणयंत्र अथवा शस्त्रक्रिया करून ऐकू येऊ शकते. त्यांना बोलण्याचे प्रशिक्षण देऊन बोलते करता येते. पण हे सर्व वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापर्यंत केले तरच यश मिळते.

पुण्यातील हिंदुराज मित्र मंडळ या नामवंत सेवाभावी संस्थेने दापोलीमध्ये हे काम सुरू केले आहे. या कामासाठी बळ हवे आहे. सर्वेक्षण करून अशी बालके शोधणे, त्यांच्या पालकांना प्रबोधन करणे, या मुलांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था करणे, प्रशिक्षक तयार करणे, श्रवणयंत्र आणि ऑपरेशनसाठी तजबीज करणे, या समस्येसाठी समाजात जागरूकता करणे इत्यादी कामांसाठी स्वयंसेवकांची जरुरी आहे. ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी कॉक्लिया वाचा भाषा प्रशिक्षण केंद्र, दापोली, द्वारा डॉ. प्रकाश घांगुर्डे, १/२, श्रुती अपार्टमेंट, भाजप कार्यालयासमोर केळसकर नाका, दापोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्रकाश घांगुर्डे यांच्याशी 9423877388 किंवा 7875772027, कॉक्लियाचे डॉ. अविनाश वाचासुंदर 9822046072, लवीत पवार (मुख्याध्यापक) 9405159694, वैभव बहुतुले (संवाद कार्यकारिणी संघटना, पुणे, जनसंपर्क अधिकारी) 7264919894 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply