रत्नागिरी-सिंधुदुर्गात करोनामुक्तांपेक्षा नवे बाधित अधिक

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. आज (८ एप्रिल) नवे १४० रुग्ण आढळले, ५९ जण करोनामुक्त झाले, तर दोघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वेगळी स्थिती नाही. आज नवे ९३ रुग्ण आढळले, तर ४१ करोनामुक्त झाले. आज एकाचा मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती

आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक ५५ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. आज ५९ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ४२, दापोली १६, खेड ९, चिपळूण १०, संगमेश्वर आणि राजापूर प्रत्येकी २. (एकूण ८१). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १३, दापोली १८, खेड २, गुहागर ७, चिपळूण ६, संगमेश्वर ९, मंडणगड १, लांजा ३. (एकूण ५९) (दोन्ही मिळून १४०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार २० झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७८९ आहे. त्यातील सर्वाधिक १४६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३४९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ५७५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज पुन्हा कमी झाला असून तो ८७.९७ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात आज एक पुरुष आणि एका महिलेचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद झाली. चिपळूण तालुक्यातील ५० वर्षीय महिला आणि रत्नागिरी तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष दोघांचाही मृत्यू काल झाला. त्यांची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३८८ असून मृत्युदर ३.२३ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६०९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख चार हजार १२१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (८ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ९३ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७७५४ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ८४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज ४१, तर एकूण ६७१२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज जिल्ह्यात एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कुंभारमाठ (मालवण) येथील ६४ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १९३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply