परिस्थितीपुढे न झुकणाऱ्या गुणवत्तेकरिता ‘दिशान्तर’चा ‘ज्ञानयज्ञ’

चार वर्षांत युवाशक्तीला एकवीस लाखांची शिष्यवृत्ती प्रदान


चिपळूण : कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यामुळे या मुलांना विपरीत परिस्थितीशी झुंजण्याचे अलौकिक बळदेखील निसर्गतः मिळाले आहे. गावकुसापासून दूरवरच्या वाड्यावस्त्या त्या साऱ्या अडचणींच्या जंगलवाटा तुडवत शिक्षणासाठी चाललेली पायपीट.. यातही कुणी अर्थदुर्बल तर कुणी कौटुंबिक आधार गमावलेला. अशा साऱ्या देशाच्या भावी आधारस्तंभांना शिष्यवृत्तीतून सहकार्याचा स्नेहार्द हात देण्याचा उपक्रम दिशान्तर संस्थेने सुरू ठेवला असून २१ लाखांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे.

माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहराकडे जाणे, डोनेशन, रोजचा प्रवास वा बाहेरगावी राहण्याचा खर्च अशा साऱ्यांमुळे अंगी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतात. गावकुसापासून दूरवर राहणाऱ्यांना जंगलवाटा तुडवत शाळेत जावे लागते. शिक्षणासाठी चाललेली पायपीट प्रसंगी सहन होते. पण, यात कुणाची आई नाही, तर कुणाचे वडील नाहीत. कुणाचे दोघेही नाहीत. आई-वडील आहेत तर अल्प उत्पन्नामुळे केवळ पोट भरण्यापुरते साधन. कौटुंबिक निराधार व अर्थदुर्बल अशा स्थितीतील युवाशक्तीला केवळ देशाचे उद्याचे आधारस्तंभ म्हणून चालणार नाही तर आज त्यांना स्नेहार्द पाठबळाची गरज असते.

सह्याद्रीच्या दरखोऱ्यांतील दुर्गम वाडीवस्तीवर काम करताना दिशान्तर संस्थेला विद्यार्थ्यांची ही व्यथा लक्षात आली होती. त्यातूनच ज्ञानयज्ञ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्याचे तीन टप्पे आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास पेटी, परीक्षा पॅड, खाऊ डबा, पाणी बाटली अशा शैक्षणिक साहित्यासह दप्तर देण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालीन विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखांकरिता क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तकपेढी कॉलेजनिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंचवीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

याचजोडीने काही विद्यार्थ्यांना एस. टी. पासेसदेखील देण्यात आले. ज्ञानयज्ञच्या तिसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी १२९ विद्यार्थ्यांना सात लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत २१ लाख २ हजाराची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात दिशान्तरला यश आले आहे. यावर्षी कोविडमुळे शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम टाळण्यात आला, तरी संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम पोहोचविण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply