रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सप्तसूर म्युझिकल्स रत्नागिरी निर्मित ‘रंग पांडुरंग’ हा अभंगांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. फेसबुक पेज आणि यूट्यूबवर हा कार्यक्रम मंगळवारी, २० जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरीतील युवा गायिका तन्वी मोरे आणि लीना खामकर अभंग गायन सादर करणार आहेत.
करोना संकटामुळे वर्षभराहून अधिक कालावधी संगीतप्रेमी रसिक लाइव्ह कार्यक्रमांना मुकले आहेत. सप्तसूर म्युझिकल्स यासाठी ऑनलाइन स्वरूपात विविध कार्यक्रमांची मेजवानी आषाढ महिन्यात रसिकांना देत आहे. त्याकरिता अखिल चित्पावन विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमांतर्गत कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे सादर झाले. याला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उद्या (दि. २० जुलै) आषाढी एकादशीनिमित्त सायंकाळी साडेसहा वाजता फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून सादर होणाऱ्या रंग पांडुरंग कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना निरंजन गोडबोले यांची आहे. तन्वी मोरे आणि लीना खामकर या युवा गायिकांना निखिल रानडे आणि केदार लिंगायत यांची तबलासाथ, तर मंगेश मोरे, संतोष आठवले आणि निरंजन गोडबोले संवादिनीसाथ करणार आहेत. प्रा. सुहास सोहनी यांनी तालवाद्याची साथ केली आहे.
कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री. गोडबोले यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

