बॅ. नाथ पै जन्मशताब्दी : खासदार राऊतांकडून सिंधुदुर्गातील १३० वाचनालयांना ‘सिंधुसाहित्यसरिता’ची भेट

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या २२ साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केले आहे. कोकणचे भाग्यविधाते आणि साहित्यरसिक म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बॅ. नाथ पै यांना ते पुस्तक अर्पण करण्यात आले असून, त्यांच्या अमोघ वक्तृत्वाविषयीचा विस्तृत लेखही त्या पुस्तकात आहे. बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी नुकतीच २५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, हे पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १३० वाचनालयांना भेट पाठवण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे.

मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये २५ सप्टेंबर २०२१ रोजी, नाथ पैंच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी मालवणच्या साने गुरुजी वाचन मंदिराच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर आणि कट्टा येथील बॅ. नाथ पै वाचनालयाच्या ग्रंथपाल सुजाता पावसकर यांना प्रसिद्ध साहित्यिक रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते पुस्तक प्रदान करण्यात आले. या वेळी ‘सेवांगण’चे अध्यक्ष देवदत्त परुळेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, अदिती पै, प्रा. आनंद मेणसे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, ‘सेवांगण’चे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अन्य १२८ वाचनालयांनाही हे पुस्तक खासदार विनायक राऊत यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती सत्त्वश्री प्रकाशन अर्थात कोकण मीडियाने पुस्तक रूपात आणि ई-बुक रूपात १५ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख यातून करून देण्यात आली आहे. हे पुस्तक ‘कोमसाप-मालवण’ने बॅ. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केले आहे. या पुस्तकात सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला “बॅ. नाथ पै- ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन” हा लेख खासदार विनायक राऊत यांना फार भावला. हा लेख, तसेच पुस्तकातले अन्य साहित्यिकांवरील वाचनीय लेख जिल्ह्यातील सर्व वाचकांपर्यंत जावेत अशी इच्छा खासदार राऊत यांनी प्रकट केली.

वाचनालयांना भेट दिल्या जाणाऱ्या या पुस्तकासोबत देण्यासाठी खासदार राऊत यांनी एक निवेदन लिहिले आहे. “ज्यांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची आपण मला संधी दिलीत, ते आम्हां सर्वांचे लाडके संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दीचा आज शुभारंभाचा दिवस! संसदीय कामकाजासोबत बॅ. नाथ पै यांनी साहित्य, संस्कृती, नाट्य, चित्र, शिल्प आदींच्या रसिकतेत आपला एक आगळा ठसा उमटविला आहे. बॅ. नाथ पै आपल्याला सोडून जाऊन अर्धशतक लोटले असले, तरी त्यांच्या स्मृती माझ्या मतदारसंघात अजूनही टवटवीत आहेत. त्यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व मला या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना नेहमीच नंदादीप ठरलेले आहे. बॅ. नाथ पै यांना आपल्या मतदारसंघातील साहित्यिकांबद्दल नेहमीच अभिमान आणि आदर असायचा. म्हणून बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाला माझ्या मतदारसंघातील लेखकांनी लिहिलेले, माझ्या मतदारसंघातील साहित्यिकांवर प्रकाश टाकणारे आणि बॅ. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केलेले, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा-मालवण यांचे “सिंधुसाहित्यसरिता” हे पुस्तक आपणांस भेट म्हणून देत आहे,” असे त्यांनी निवेदनात लिहिले आहे.

‘खासदार विनायक राऊत यांच्या या कृतीमुळे आमच्या उपक्रमाचे सार्थक झाले,’ अशी प्रतिक्रिया सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे संपादक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केली.

(सिंधुसाहित्यसरिता या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी https://wa.me/919850880119 या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअॅपद्वारे ऑर्डर नोंदवू शकता. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply