‘खो-खो’ला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ संघटक मुकुंद आंबर्डेकर कालवश

रत्नागिरी : खो-खो हा अस्सल भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ संघटक मुकुंद विष्णू आंबर्डेकर यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी पुण्यातील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोकणातील कुरतडे (ता. जि. रत्नागिरी) हे त्यांचे मूळ गाव. खो-खो या देशी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यामुळे खो-खो या खेळाचा चालताबोलता इतिहास आता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर बुधवारी (८ डिसेंबर) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे हे आंबर्डेकर यांचे मूळ गाव. बालपणातील काही काळ त्यांचे या गावात वास्तव्य होते. त्यांचे वडील मुंबईला असल्याने पुढे ते मुंबईला गेले. मुंबईतल्या व्हीजेटीआय या नामवंत संस्थेतून त्यांनी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन शाखांतून पदवी घेतली होती. नंतरच्या काळात त्यांचे वास्तव्य पुण्यात होते; पण गावाशी त्यांचा संपर्क कायम होता. उत्सव, संमेलने आदींच्या निमित्ताने अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत त्यांचे मूळ गावी येणे-जाणे असे. त्यांच्या पश्चात पुत्र शशांक, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

खो-खो खेळातील गुणवंतांना हेरून त्यांना दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले. खो-खो खेळाच्या प्रसारासाठी संघटनात्मक बांधणीचे महत्त्व ओळखून त्यांनी त्यात भरीव कार्य केले. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. हा खेळ देशपातळीवर पोहोचवण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय नेरूरकर सुवर्णचषक स्पर्धा सुरू केली. तसेच, त्यापुढे जाऊन खो-खो देशापुरताच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा, म्हणून आशियाई खो-खो संघटनेची बांधणीही आंबर्डेकर यांनी केली. आज जवळपास २५ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. त्यामागे आंबर्डेकर यांच्या कार्याचा वाटा मोठा आहे.

ते महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे संस्थापक होते आणि त्या संस्थेचे सचिव आणि कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. हिंदुस्थानी खो-खो महासंघाचे ते माजी सरचिटणीस होते. तसेच, आशियाई खोखो फेडरेशनचे संस्थापक आणि पहिले सरचिटणीसही ते होते. कडक शिस्तीचे मार्गदर्शक, उत्कृष्ट संयोजक, व्यवस्थापक आणि संघटक असा त्यांचा लौकिक होता.

ते क्रीडा भारतीचे संस्थापक सदस्य आणि सक्रिय कार्यकर्ते होते. क्रीडाभारतीतर्फे होणाऱ्या क्रीडा प्रबोध स्पर्धा पूर्वी राज्यस्तरीय पातळीवर व्हायच्या. त्यातील विजेत्यांना पाच हजार रुपये, तीन हजार आणि दोन हजार अशी बक्षिसे असायची. सुमारे १० वर्षांपूर्वी सलग दोन वेळा देवरुखमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवले होते. तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी मुकुंद आंबर्डेकर, तसेच रमेश बोंद्रे यांनी आवर्जून हजेरी लावली होती, अशी आठवण क्रीडाभारतीच्या कोकण प्रांत कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वनाथ बापट (रत्नागिरी) यांनी सांगितली.

सध्या भारतीय खेळांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबवले जात असल्याने या खेळांना चांगले दिवस आले आहेत. या पार्श्वभूमीवर, खो-खोसाठी आयुष्य वेचलेल्या आंबर्डेकर यांच्या निधनाने क्रीडाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आपल्या मातीतील खेळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी झटलेला हिरा महाराष्ट्राने आणि कोकणाने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

(आकाशवाणी पुणे केंद्रावरून ९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.१० ला प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्यांमध्ये मुकुंद आंबर्डेकर यांच्या निधनाच्या वृत्तासह त्यांच्या कार्याची माहितीही देण्यात आली. हे बातमीपत्र खालील यू-ट्यूब लिंकवर ऐकता येईल. व्हिडिओच्या प्ले बटणावर क्लिक करावे.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply