मुंबई : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेली गीत गायन स्पर्धा चांगलीच गाजली.
स्वामी संस्थेने ४ वर्षांपूर्वी विरंगुळा नावाचा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य गीत गायन स्पर्धा काल (दि. १६ जानेवारी) परळ येथील भावसार सभागृहात पार पडली. हौशी आणि ज्येष्ठ गायकांचा मिलाफ तेथे झाले. वय वर्षे ८४ पार केलेले घाडी मास्तर हार्मोनियमवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अविरत सर्व गायकांना साथ देत होते, तर ८० पार केलेले स्पर्धक नाचत गीत सादर करत होते. जगभरातील ही अशी पहिलीच स्पर्धा असावी. स्पर्धेत पहिल्या फेरीत उत्तीर्ण न झालेलेही अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देत शेवटपर्यंत सभागृहात थांबले होते.
सकाळच्या सत्रात मुंबई फेसकॉमचे अध्यक्ष शरद डिचोलकर, आग्रीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी सुशांत पेडणेकर, साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर, परीक्षक त्रयी महापौर पुरस्कारप्राप्त चंद्रकांत साखरपेकर, तुषार खानोलकर, मनोज कदम आणि स्वामीचे अध्यक्ष मोहन कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाल. ज्येष्ठ गायकांनी “खरा तो एकचि धर्म” ही प्रार्थना सादर करून सभागृह भारावून टाकले.

एकामागे एक हौशी ज्येष्ठ स्पर्धक येत होते आणि परीक्षकांसाठी आव्हान निर्माण करत होते. व्यासपीठावरून खाली येताच स्वामीचे कार्यकर्ते स्पर्धकांना सन्मानपूर्वक सहभाग प्रमाणपत्र देत होते. स्पर्धा केवळ नावाला उरली होती. तो जणू स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला होता. शाळासोबती कित्येक वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर जो आनंद असतो, तोच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. या सार्यावर कळस म्हणजे दत्ताराम घाडी, नंदकिशोर आरोंदेकर, दिलीप मेस्त्री, मंगेश तळगावकर, विजय घाडी, संतोष घाडी, नितीन तांबे आणि शिवाजी गावकर हे स्वामीचे वादक कलाकार परीक्षकांसोबत स्पर्धकांचीही दाद मिळवत होते. अंतिम फेरीच्या मध्यंतरात स्वामीचे हौशी ज्येष्ठ गायक राजरत्न कदम यांनी अनुप जलोटा यांचे “ऐसी लागी लगन” हे भजन सादर केले आणि सभागृह भक्तिरसात न्हाऊन गेले.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नाना पालकर स्मृती समितीचे विश्वस्त किरण करलकर, बांद्रा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सुधाकर भाटवडेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश भगत, डॉ. रश्मीन जैन, रमेश धात्रक, हिरेश चौधरी असे विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या वेळेप्रमाणे सभागृहात हजर होत होते आणि स्पर्धकांसोबतच आयोजकांचेही मनोबल वाढवत होते.
परीक्षक चंद्रकांत साखरपेकर, तुषार खानोलकर, मनोज कदम यांनी चोख परीक्षण करताना प्रथम क्रमांक मधुकर कमलाकर वत्स, द्वितीय क्रमांक भरत कस्तुर, तृतीय क्रमांक विभागून जगदीश मुदलियार आणि दिलीप मेस्त्री यांना, तर उत्तेजनार्थ दीपक आजरेकर आणि गणेश करलकर यांना गायकी, उच्चार, सादरीकरण यांच्या एकत्रित गुणांकनाच्या आधारे जाहीर केला. विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सकाळचा चहा, अल्पोपाहार, दुपारचे जेवण आणि संध्याकाळी चहा-कॉफी-बिस्किट देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिचा आस्वाद ज्येष्ठ नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घेतला. तरुणाईने त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. संपूर्ण दिवसभर स्पर्धेचे सूत्रसंचालन न थकता करून सर्वांना सांभाळून घेत, स्पर्धा सातत्याने प्रवाहित ठेवण्याचे काम अनिल तावडे यांनी चोख बजावले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहन कटारे, प्रदीप ढगे, राजरत्न कदम, वैशाली शिंदे, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, रचना खुळे, साध्वी डोके, ममता खेडेकर, जयश्री भोसले, सुमंगल गुरव, विजया सुर्वे, गोविंद राणे आणि उल्हास हरमळकर यांनी अविरत मेहनत घेतली.
(गुरुदत्त वाकदेकर)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड