पर्यटनवाढीसाठी शासकीय पाठबळ आवश्यक – रमेश कीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी अनेक पायाभूत सुविधांची गरज असून त्यासाठी शासकीय पाठबळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीतील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आणि उद्योजक रमेश कीर यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे आज येथील अल्पबचत सभागृहात चौथ्या पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन असा आजच्या परिषदेचा विषय होता. त्यावेळी पर्यटन उद्योजकांच्या समस्या मांडताना श्री. कीर म्हणाले की, ठिकठिकाणी दिशा आणि मार्गदर्शक फलक उभारणे, रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. वर्षानुवर्षे त्याबाबत मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. जिल्हाधिकारी आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांना या समस्या समजावून सांगायला गेले, तर भेटही मिळत नाही. सध्या मात्र पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांसह सर्वच उद्योजक अडचणीत आहेत. सध्या पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. पण एकदा का मूलभूत पायाभूत सुविधा शासनाने दिल्या की नंतर दोन-चार वर्षांत पर्यटन क्षेत्रातील उद्योजक प्रशासनाकडे येणारही नाहीत. कारण सुविधा निर्माण झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ एवढा वाढेल की, त्यांना तेवढा वेळही मिळणार नाही आणि त्यांना प्रशासनाकडे येण्याची गरजही राहणार नाही.

प्रशासनाच्या प्रतिनिधी म्हणून यावेळी उपस्थित असलेल्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या की, यातील काही बाबी पर्यटन महामंडळाशी संबंधित आहेत. तरीही प्रशासनाची प्रतिनिधी म्हणून मी त्यांची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या मागण्या पोहोचवीन.

परिषदेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले. ते म्हणाले, या वेळी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, पर्यटन चळवळ ही एक मोहीम आहे. ती अनेक वर्षे चालवणे आवश्यक आहे. पर्यटन सेवा सहकारी संस्थेच्या राजू भाटलेकर यांनी सलग चार परिषदा घेतल्या. यातून रत्नागिरीचा पर्यटन विकास साधण्याकरिता उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संस्कृती जपून पर्यटन विकास करण्याकरिता साऱ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मंदिरे, गडकिल्ल्यांचे जतन करण्याकरिता पर्यावरणही जपू या; परंतु त्यात काही अडचणी आल्यास पर्यायी मार्ग काढला पाहिजे. कांदळवनामुळे चिपळूण, खेडला जोडणारा एक मोठा पूल होऊ शकत नसल्याची खंत श्री. जाधव यांनी व्यक्त केली. २०१२ मध्ये तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी कांदळवनाचे क्षेत्र निश्चित करावे. कारण याची वाढ अनियंत्रित असते, असे सांगितले होते; परंतु आजपर्यंत असे क्षेत्र निश्चित केलेले नाही. त्यामुळे त्याचा फटका विकासकामांना बसत आहे. गुहागरमध्येही गॅलरीमुळे कासवांना धोका नसतानाही कासव बचावाचे कारण पुढे करण्यात आले आणि गॅलरी पाडावी लागली होती. याचा फटका पर्यटन विकासाला बसत असल्याचे आता दिसू लागले आहे, असे श्री. जाधव म्हणाले.

ग्लोबल चिपळूण पर्यटन संस्थेचे प्रतिनिधी समीर कोवळे यांनी पर्यटन संस्था चालविताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. अनेक गैरसोयी आणि परवान्यांचा अडसर येतो. तो दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उद्योजक शाळिग्राम खातू, इंद्रजित नागेशकर, सुबोध गरूड, संतोष कामेरकर, हिरवळ संस्थेचे प्रमुख किशोर धारिया, संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर उपस्थित होते. सुहास ठाकूरदेसाई आणि सुधीर रिसबूड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन राजू भाटलेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply