रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोलधे हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. या गावात श्री मल्लिकार्जुनाचे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराविषयीची माहिती, दंतकथा, तिथे होणारे उत्सव आणि महाशिवरात्रीचा मुख्य उत्सव याबद्दलचा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात संतोष श्रीराम तांबे यांनी लिहिला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
कोलधे हे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले, मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे आठ-नऊ किलोमीटरवर असणारे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव. साधारणतः आठशे ते नऊशे लोकवस्ती असणारे हे निसर्गरम्य गाव आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, आहारमहर्षी काकासाहेब तांबे, सदाशिव धोंडो तथा तांबे शास्त्री वगैरे ऐतिहासिक नावांची व्यक्तिमत्त्वे या गावाशी संबंधित, किंबहुना याच गावातील आहेत.
पारंपरिक भात शेती, नारळी-पोफळींची आगरे, आंबे-फणस, काजू-कोकम हेच इथल्या लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन! यातून राहणारी तूट विशेषतः चाकरमान्यांकडून येणाऱ्या मानिऑर्डरवर निभावून नेली जाते. इथले लोक विशेष सधन नसले, तरीही भाजी भाकरी खाऊन सुखी आहेत. प्रचलित उक्तीप्रमाणेच कोकणात गरिबी असली, तरी येथील ग्रामस्थ हे कष्टाला वा श्रमदानाला कधीच कमी पडत नाहीत व आपल्या अल्प उत्पन्नातूनही काही आर्थिक सहभाग देऊन व अनमोल श्रमदान करून गावातील देव-देवालयांचे जीर्णोद्धार, विविध वार्षिक उत्सव वगैरे यथासांग व परंपरापूर्वक मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात. कोकणी माणूस हा पिढीजातच उत्सवप्रिय असल्याने केवळ स्वतःच्या गावातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या गावांतील उत्सवांतही नद्या-नाले, दगड धोंडे-जंगल यांतून कधी-कधी जंगली श्वापदांना तोंड देत रात्रीच्या वेळी मैलोन्मैल पायी प्रवास करत (पूर्वी रस्ते-गाड्या वगैरे सुविधा नव्हत्या) उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन एक आगळा आनंद मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. कोलधे गावात पुरातन आणि स्वयंभू असे श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे. कोलधे गावातील काही सुजाण पूर्वजांनी आपल्या हस्ताक्षरात अल्पस्वरूपात लिहून ठेवलेल्या हस्तलिखितावरून आम्हा तांबे मंडळींच्या ज्ञात मूळ पुरुषाचा कालखंड हा सुमारे १४व्या शतकातील होता असे कळते. त्याच्या पूर्वीपासूनही कोलधे येथे श्री मल्लिकार्जुन मंदिर असल्याचा उल्लेख मिळतो.
या मंदिराची बांधकाम शैली एकप्रकारे हेमाडपंतीच म्हणावी लागेल. संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडात असून कोठेही सिमेंट वगैरेचा वापर दिसत नाही. दोन दगडांची जुळणीही एवढी सूक्ष्म व अचूक केलेली दिसते, की सांधा आहे हे पटकन लक्षात येत नाही.

मल्लिकार्जुन मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा. माघ वद्य दशमी ते फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या कालावधीत हा उत्सव साजरा होतो. खूप आधीपासूनच या उत्सवाची तयारी ग्रामस्थ मोठ्या अगत्याने करत असतात. या उत्सवासाठी मुंबई-पुणे व अन्यत्र राहणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. हा उत्सव म्हणजे एक आनंदसोहळाच असतो.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…









