चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज (४ एप्रिल २०२३) चिपळूण तालुक्यातील मोरवणे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बहादूरशेख नाका ते मोरवणे गावापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलीस दलाचे स्काउटदेखील अंत्ययात्रेसोबत होते. अंत्यसंस्काराच्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी ढगळे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही सुभेदार ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि ढगळे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
108 इंजिनीअर रेजिमेंटचे लेफ्टनन्ट कर्नल रोशन चव्हाण, मेजर शिवकुमार एस. एन., 2 STC पणजी गोवा सुभेदार जे. आलम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, चिपळूण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, सैनिक कल्याण विभागाच्या संचालकांच्या वतीने दीपक मोरे आदी मान्यवरांनी या वेळी हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी बॉम्बे इंजिनीअर ग्रुपचे एक ऑफिसर, सात जेसीओ, ३१ जवान, 2 STC पणजी गोवाचे एक जेसीओ, १७ जवान, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांचे जवान, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक संघटना, आजी-माजी सैनिक, पोलीस गार्ड यांनी ढगळे यांना श्रद्धांजली वाहिली. कर्नल रोशन चव्हाण यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ इंडियाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. GOC, M&G Area यांच्या वतीने सुभेदार मेजर लक्ष्मण गवळी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित इतर मान्यवरांकडून व जनसमुदायांकडून पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या वेळी पोलीस दल आणि सैन्यदलाने हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांना प्रत्येकी तीन फैऱ्या झाडून सलामी दिली. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या वीरपत्नी श्रीमती अनुजा अजय ढगळे यांना राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. अंत्ययात्रेला व अंत्यसंस्काराला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची टेहळणी करण्यासाठी गेलेले असताना सुभेदार अजय ढगळे हुतात्मा झाले. ते याआधी कारगिलमध्ये झालेल्या युद्धात टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादूर टीममध्येही होते.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

