पुणे : येथील विश्व मराठी परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांचा ऑनलाइन कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग येत्या २२ एप्रिलपासून सुरू होणार असून तो १८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
कीर्तन आणि प्रवचन ही एक प्राचीन सांस्कृतिक कला आहे. पूर्वी आकाशवाणी, दूरदर्शन, इंटरनेट नव्हते, तेव्हा कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते हेच सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणाची माध्यमे म्हणून कार्यरत होते. त्यांच्याद्वारेच समाजाचे मानसिक, भावनिक, नैतिक आणि आध्यात्मिक पोषण होत होते. समाजव्यवस्थेचे रहाटगाडगे व्यवस्थित चालवण्यासाठी आणि समाजाचे नैतिक अधिष्ठान टिकवण्यासाठी कीर्तनकारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता पुन्हा एकदा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना चांगले दिवस येत आहेत. त्याला तंत्रज्ञान कारणीभूत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जगभर पोहोचवण्याची संधी कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना उपलब्ध झाली आहे. पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि कीर्तनविश्व यांनी हा अभ्यासक्रम आयोजित केला आहे.
चार महिन्यांच्या कालावधीत सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ८.०० ते ९.३० या दीड तासात हा वर्ग चालणार आहे. अभ्यासवर्गात प्रमुख ५ कीर्तन परंपरांचा अभ्यास, पुण्यात दोन दिवसांची दोन प्रत्यक्ष मार्गदर्शक सत्रे होतील. कीर्तनकलेचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास, कीर्तन आख्यानांची तयारी, पूर्वरंग आणि उत्तररंग, अभ्यास आणि सराव, सादरीकरणाची कौशल्ये, विषयांची मांडणी, पूरक हावभाव, देहबोली, श्लोक–सुभाषिते, भाषांतर, कथानके, उदाहरणे, प्रतिपादन कौशल्ये, उपयुक्त अभ्यास साहित्य आणि संदर्भग्रंथांची माहिती दिली जाईल. उजळणीसाठी प्रत्येकाला रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाईल. अभ्यासवर्गासाठी ऑनलाइन प्रवेश दिला जाणार असून या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय अॅक्रिडिटेशन आहे. करियरविषयक मार्गदर्शन आणि साह्य केले जाईल. १५ वर्षांवरील किशोवयीन मुले-मुली, तरुण पुरुष, महिला अशा सर्वांना प्रवेश दिला जाईल. अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२३ आहे.
अभ्यासक्रमाविषयी व्हॉट्स अॅपवर माहिती मागवण्यासाठी 7843083706 या क्रमांकावर कीर्तन अभ्यासक्रम असा मेसेज पाठवावा. अधिक माहितीसाठी स्वाती यादव (9673998600, 7843083706, 020-25530371) यांच्याशी किंवा sampark@kirtanvishwa.org या ईमेलवर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी https://www.kirtanvishwa.org/abhyaskram या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.

