रत्नागिरी : अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
भिडे गुरुजींनी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नैतिकता हा सध्याच्या काळात महत्त्वाचा कळीचा मुद्दा बनला आहे. स्त्रिया म्हणजे भारतमातेचे एक मूर्तिमंत प्रतीक, रूप असून सर्वांनी स्त्रियांचा सन्मान, आदर केला पाहिजे. स्त्रियांकडे पवित्रतेच्या दृष्टीतून पाहण्याची भावना जोपासली पाहिजे. भारताला राष्ट्र म्हणून टिकायचे असेल तर इतिहासाचा अभ्यास आणि नैतिकता या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते भिडे गुरुजींचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था असून तिची स्थापना भिडे गुरुजींनी केली, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, एखादा माणूस आपले वय, प्रकृती इत्यादींचा विचार न करता अत्यंत निग्रहाने किती काम करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मामा म्हणजेच भिडे गुरुजी आहेत. तरुणांना व्यायामाची सवय लागावी, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून दररोज सकाळी सांगलीच्या घाटावर जाऊन १०८ सूर्यनमस्कार घालताना मी गुरुजींना पाहिले आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला येत नाही, म्हणून ती करणे सोडून द्यायचे नाही. ती गोष्ट येईपर्यंत सतत प्रयत्न करत राहायचे हे मी लहानपणापासून माझ्या कुटुंबाकडून शिकत आले आहे. आपण सर्वांनीही प्रयत्नपूर्वक काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, तिन्ही शाखांच्या उपप्राचार्या, विभागप्रमुख, प्राध्यापक-अध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आभार मानले.


