कोकण मीडियाचा २०२३चा दिवाळी अंक आठवणीतल्या कोकणावर…; लेख आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२३चा दिवाळी विशेषांक ‘आठवणीतलं कोकण’ या विषयाला वाहिलेला आहे. ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावर लेख आणि चित्रं मागवण्यात येत असून, सर्वोत्कृष्ट लेख आणि चित्रांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत. सविस्तर वाचा पुढे

आठवण ही अशी गोष्ट आहे, की जी आपल्याला भूतकाळ पुन्हा अनुभवण्याची संधी देते. भूतकाळात अडकून न पडता भविष्यकाळाची उत्तुंग स्वप्नं पाहत त्या दिशेने जाण्यासाठी वर्तमानात प्रयत्न करायचे असतात, हे अगदी बरोबरच; पण समृद्ध भूतकाळाच्या आठवणींत डोकावून पाहिलं, तर आपल्याला खूप काही शिकताही येतं… विकासाच्या वेगवान आणि रंगीबेरंगी वाटेवरच्या जीवघेण्या स्पर्धेत तग धरताना संथ भूतकाळाच्या आठवणी कृष्णधवल असल्या, तरी जिवाला दिलासा देतात आणि मनःशांतीही… पुढे जाण्याच्या धावपळीत आपण काय गमावून बसलो आहोत, याचा धांडोळा घेता येतो… तसंच, जुन्यातलं काय काय सोनं आहे आणि काय काय ‘जाळुनि किंवा पुरुनि टाकण्यासारखंच’ आहे, हेही शोधता येतं… आणि जुन्या-नव्याची सांगड घालून उज्ज्वल भविष्यकाळ घडवता येऊ शकतो…!

हाच विचार ठेवून साप्ताहिक कोकण मीडियाने यंदाचा (२०२३) दिवाळी विशेषांक ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावर काढायचं ठरवलं आहे. रमणीय निसर्ग, आश्चर्यकारक जैवविविधता, उत्तमोत्तम कला, संस्कृती, चालीरीती, प्रथा-परंपरा, सण-उत्सव… या आणि अशा अगणित गोष्टींचं वरदान कोकणाला लाभलं आहे. दैवी अनुभूती देणाऱ्या सुंदर मंदिरांपासून सश्रद्धतेने, उत्साहाने केल्या जाणाऱ्या उत्सवांपर्यंत, देखण्या नि नेटक्या घरांपासून चविष्ट, पौष्टिक पदार्थांपर्यंत, फळांच्या राजापासून काळ्या मैनेपर्यंत, उंचच उंच डोंगरकड्यांपासून अथांग समुद्रापर्यंत, छोट्या ओहळांपासून रौद्रभीषण धबधब्यांपर्यंत, घनदाट देवरायांपासून मोकळ्या सड्यांपर्यंत, पाण्याने भरलेल्या भातखाचरांपासून वाऱ्याने डोलणाऱ्या नारळबागांपर्यंत अशा किती तरी प्रकारचा समृद्ध वारसा अत्यंत श्रद्धावान, कष्टाळू आणि समाधानी अशा कोकणी माणसाने आतापर्यंत जपून ठेवला आहे, आपल्या परीने वाढवलाही आहे.

तरीही काळाच्या ओघात आता अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. ‘न बदलणारी एकमेव गोष्ट म्हणजे बदल’ हे खरं आणि काही बदल अपरिहार्य आहेत, हेही खरं; मात्र विकासाच्या मंत्राचा जप करताना समृद्ध वारशातल्या अनेक गोष्टी आपण हरवून बसत चाललो आहोत. कोकणासारख्या देवभूमीच्या बाबतीत तर हे अधिकच जाणवतं. त्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी आणि आठवणीतलं कोकण शब्दचित्रांद्वारे जपून ठेवण्यासाठी साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दिवाळी अंक ‘आठवणीतलं कोकण’ या विषयाला वाहिलेला असेल. या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून, विजेत्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत. विजेत्यांसह अन्य उल्लेखनीय लेख आणि चित्रं दिवाळी अंकात समाविष्ट केली जाणार आहेत.

कोकणातले दुतर्फा घनदाट झाडं असलेले रस्ते, त्यावरून केलेला प्रवास, विस्मरणात गेलेले जुने वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, त्यांच्या रेसिपीज, ते पदार्थ करतानाच्या गमतीजमती, घरात चटणी कुटण्यासाठी असलेलं वाइन, जातं, दगडी आपेपात्र, पाटा-वरवंटा, शेवया पाडण्याचा शेवगा, खलबत्ता अशी जुनी उपकरणं, स्वयंपाकघरातील चूल, पाणचूल, चुलीला सकाळी घातलं जाणारं पोतेरं, न्हाणीघर, न्हाणीघरात सकाळीच घातला जाणारा विस्तव आणि हंड्यावरच्या गरमगरम पाण्याने केलेली आंघोळ, डोणी, दर वर्षी पावसाळ्यानंतरचा अंगण/खळं तयार करण्याचा कार्यक्रम, चोप काढणं, अंगण सारवणं, उन्हाळ्यात रात्री आकाशदर्शनाचा आनंद घेत त्या अंगणात झोपणं, अंगणात किंवा ओटीवर असलेला झोपाळा, त्या झोपाळ्यावर बसून मारलेल्या गप्पा, घरांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना, कोकणातल्या जुन्या काळातल्या शेतीच्या काही आठवणी, काही वेगळी पिकं घेतली असल्यास किंवा वेगळ्या पद्धती वापरल्या असल्यास त्याच्या आठवणी, गायी-गुरं, मांजर-कुत्र्यांसारखे पाळीव प्राणी, गावाच्या ठिकाणाहून तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी उलटसुलट किंवा दोन-तीन एसटी गाड्या बदलून करावा लागणारा प्रवास, कुठे तरीतून किंवा होडीतून करावा लागणारा प्रवास, इतक्या दुर्गम स्थितीतही भाऊबीज, रक्षाबंधन किंवा अन्य कोणत्याही सणांसाठी आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी जाताना येणारी मजा, कोकणातल्या उन्हाळ्यातल्या आठवणी, आंबे-फणस-करवंदं-काजू-तोरणं-आटकं अशा फळांचा आस्वाद, पावसाळ्यातल्या, तसंच नदीवरच्या आठवणी, कोकणातल्या जुन्या काळातल्या शाळांमधल्या आठवणी, शेतातली काही खूप जुनी झाडं, त्यांना दिलेली वैशिष्ट्यपूर्ण नावं, जंगलातल्या नागमोडी पायवाटा, बेडी, सलटी, साकव, जुन्या काळातले मंदिरांतले वेगवेगळे उत्सव, तसंच गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा नेहमीच्या सणांशी निगडित आठवणी, आपले आजी-आजोबा किंवा अशाच जुन्या-जाणत्या व्यक्तींबद्दलच्या काही खास आठवणी इत्यादी इत्यादी…

ही यादी अशी अमर्याद वाढवता येईल. यांपैकी कोणताही विषय घेऊन किंवा अनेक विषयांवरच्या आठवणी शब्दबद्ध करून लेख लिहिणं अपेक्षित आहे. चित्रकला स्पर्धेसाठीही या विषयांचा वापर करता येईल. इथे उल्लेख न केलेल्या, मात्र ‘आठवणीतलं कोकण’ या विषयाशी निगडित कोणत्याही विषयावर लेख लिहिता येईल, चित्र काढता येईल.

कोकणातल्या आठवणींबद्दल अनेक जण लिहीत असतात; मात्र त्यांचं एका ठिकाणी एकत्रीकरण, दस्तावेजीकरण व्हावं, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे, हे कृपया लक्षात घ्यावं. स्पर्धेसाठी पूर्वप्रकाशित लेख किंवा चित्र पाठवू नये. शब्दमर्यादा : १००० ते १५०० शब्द (जास्तीत जास्त)

चित्रकला स्पर्धेसाठी ए फोर आकारात उभे (व्हर्टिकल/पोर्ट्रेट) चित्र पाठवावे. लँडस्केप (आडवे) चित्र कृपया पाठवू नये.

याच विषयावर कथा आणि कविताही लिहून पाठवता येतील. निवडक साहित्याला प्रसिद्धीही दिली जाईल; मात्र स्पर्धा केवळ लेख आणि चित्रांचीच असेल, याची कृपया नोंद घ्यावी.
याशिवाय अन्य कथा, कविता असं साहित्यही कोकण मीडियाच्या दिवाळी अंकासाठी अवश्य पाठवावं. योग्य साहित्याला प्रसिद्धी दिली जाईल. कोकणातल्या कोणत्याही बोलीभाषेत लिहिलेल्या साहित्याचंही स्वागत आहे.

मग पाठवताय ना तुमचं साहित्य! आम्ही वाट पाहतोय!

  • संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया

साहित्य पाठवण्याची अंतिम मुदत : २० ऑक्टोबर २०२३

ई-मेल : kokanmedia2@gmail.com

फोन/व्हॉट्सअ‍ॅप : 9422382621, 9168912621

पत्ता : साप्ताहिक कोकण मीडिया, कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply