सुरेश प्रभूप्रणित जनशिक्षण संस्थान लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली जनशिक्षण संस्थेने २५ वर्षांत कायापालट केला. आता रत्नागिरीतही लवकरच जनशिक्षण संस्थान सुरू होणार आहे. त्यातून जिल्ह्यात नक्कीच परिवर्तन सुरू होईल. कोकणात याद्वारे रचनात्मक काम उभे राहील. अनुभवसंपन्न सुरेश प्रभू यांचे खऱ्या अर्थाने कोकणाकडे लक्ष आहे. माझे कोकण आणि कोकणातील नागरिकांमध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रभूंची तळमळ असते. अशा संस्थांमुळेच रत्नागिरी जिल्ह्याचा शाश्वत विकास होणार आहे, असे प्रतिपादन भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.

सिंधुदुर्गातील जनशिक्षण संस्थान आणि पुणे विमान प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँकअंतर्गत शंभर शाळांमधील एक हजार मुलींना सायकलचे वितरण या वेळी करण्यात आले. त्या वेळी अॅड. पटवर्धन बोलत होते. टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात माजी मंत्री सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू यांनी वेबिनारद्वारे सहभाग घेतला. जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत यांनी ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

या वेळी वेबिनारद्वारे दिल्लीमधून बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक माणसाचा, घराचा, जिल्हा, राज्याचा विकास व्हायला हवा. शेतकरी, मच्छीमार, महिला, तरुण, लहान व्यापारी, मागासवर्गीय या सर्वांचा विकास हवा. नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत.

मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्ष सौ. उमा प्रभू म्हणाल्या, की शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत. जनशिक्षण संस्थान ही देशातली पहिली शिक्षण संस्था सिंधुदुर्गात सुरेश प्रभू यांनी सुरू केली. एखाद्याला मासे खायला देण्यापेक्षा मासे पकडायला शिकवले या पाहिजे, असे प्रभू सांगतात.

माजी आमदार बाळ माने यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले, की पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे २०२१मध्ये नवभारतासाठी सर्वांनी सज्ज व्हावे. परिवर्तन केंद्राची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे.

या वेळी राजू सावंत, निशिकांत भोजने, नाबार्डच्या श्रद्धा हजीरनीस, बबनराव पटवर्धन, विजय केनवडेकर, रवींद्र वाडेकर, महेश गर्दे आदी उपस्थित होते. सुधीर पालव यांनी सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply