दरवर्षीचे सागरी पाहुणे यावर्षी आलेच नाहीत….

रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.

करोनानंतरच्या सुटकेचा निःश्वास सोडत अनेक पर्यटक यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यांवर दाखल झाले. किनारे अगदी भरून गेले. दरवर्षी येणारे इतर काही पाहुणे मात्र यावर्षी अजून तरी आलेले नाहीत. हे पाहुणे समुद्र पाहण्यासाठी येत नाहीत, तर या पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. हे पाहुणे म्हणजे समुद्रातली ऑलिव्ह रिडले नावाची कासवे.

ऑलिव्ह रिडले ही सागरी कासवे कोकणातील विविध किनाऱ्यांवर दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अंडी घालण्यासाठी येतात. कोकणातील विशिष्ट हवामान त्यांच्यासाठी पोषक असते. समुद्रातून येऊन ही कासवे किनाऱ्यावरील वाळूत खोलवर घरटी तयार करून अंडी घालतात आणि समुद्रात निघून जातात. ती पुन्हा येत नाहीत. सुमारे दोन महिन्यांनंतर घरट्यांमधील अंडी पूर्ण तयार होऊ त्यातून पिल्ले बाहेर येतात आणि समुद्रात निघून जातात. चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने सुमारे १५ वर्षांपूर्वी कासवांच्या या जीवनक्रमाचा अभ्यास केला आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. ही अंडी फोडून खाणाऱ्या किनारपट्टीवरच्या लोकांचे प्रबोधन करून त्यांना कासवांचे जतन करण्यासाठी प्रवृत्त केले. कासवांच्या विशिष्ट जीवनक्रमाचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांना निमंत्रित करण्यात आले. त्यानिमित्ताने कासव महोत्सव भरविण्यात आले. कालांतराने वन विभागाने त्यात पुढाकार घेतला आणि कासवांच्या संरक्षणाचा कार्यक्रम आखला.

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील वेळास, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कर्दे, लाडघर, पाडले, मुरूड, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, राजापूर तालुक्यातील माडबन, वाडावेत्ये या चौदा गावांमधील समुद्रकिनाऱ्यावर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची मोहीम राबविली जाते. गेल्या वर्षी जिल्ह्यातील या किनाऱ्यांवर ६५२ घरट्यांमध्ये ६५ हजार ८५३ अंड्यांचे संरक्षण करण्यात आले. त्यापैकी ३२ हजार ४३३ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यात वन विभागाला यश आले.

यावर्षी मात्र त्यात व्यत्यय आला आहे. निसर्ग वादळ आणि सलग दोन वेळा समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे निसर्गाचे चक्र बिघडले. त्यामुळेच ही कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यांवर आलीच नाहीत. त्यांचा विणीचा हंगाम दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुढे ढकलला आहे. तो नव्या वर्षात सुरू होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता त्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply