खारेपाटण महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

कणकवली : स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव गं. पेंढारकर यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे येत्या २२ जानेवारीला राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी महाविदयलायत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. स्पर्धेचे विषय असे – १) जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सद्यस्थिती. २) सरकारचा कल खासगीकरणाकडे. ३) केंद्र सरकारचे कृषी धोरण शेतकऱ्यास पूरक की मारक ? ४) नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिवर्तन घडवेल का ? ५) भारतीय न्यायव्यवसथा विश्वासार्ह कि अविश्वासार्ह ? ६) लॉकडाउनचा पर्यावरणावर परिणाम. ७) कोविड लस संशोधन …. वैज्ञानिक यश की अपयश…. ८) प्रसारमाध्यमांची वास्तवता. स्पर्धेकरिता ५०००, ४००० आणि ३००० रुपयांची पहिली तीन पारितोषिके आणि उत्तेजनार्थ २००० रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धा वरिष्ठ महाविद्यलयीन विद्यार्थ्यांकरिता असून महाराष्ट्र राज्य मर्यादित आहे. एका महाविद्यालयातील किमान एक व कमाल दोन विद्यार्थीच स्पर्धेत भाग घेऊ शकतील. स्पर्धा केवळ मराठी माध्यमातून घेण्यात येणार असून स्पर्धकाला विषय सादरीकरणासाठी ८ मिनिटे + २ मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकाजवळ महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. विजेत्या स्पर्धकांच्या भाषणांना महाविद्यलयाच्या वार्षिक अंकात प्रसिद्धी दिली जाईल. स्पर्धकांनी आपल्या भाषणाची लेखी प्रत स्पर्धा आयोजन समितीकडे जमा करावी.

स्पर्धकाने प्रवास खर्च व निवास खर्च स्वतः करावयाचा आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, तर स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार संपूर्णतः स्पर्धा आयोजन समितीचा असेल.

ज्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी प्रा. तानाजी गोदडे (९९२१५१३८८४), प्रा. प्रकाश शिंदे (७५१७०६९१३२), प्रा. वसीम सय्यद (७९७२०६३३६२), प्रा. नयन उगले (९४०५४२४४६०) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply