रत्नागिरीत बुधवारी तिसरी शाश्वत पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अंबर मंगल कार्यालयात बुधवारी (२७ जानेवारी) तिसरी शाश्वत पर्यटन परिषद होणार आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार आणि तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोकणातील पर्यटनवाढीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने ही शाश्वत पर्यटन परिषद आयोजित केली आहे. उद्या सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही परिषद होईल. परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात पालकमंत्री श्री. परब यांनी रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या उभारी देण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे उद्याच्या पर्यटन परिषदेत श्री. परब घोषणा करण्याची शक्यता आहे. आमदार उदय सामंतही रत्नागिरीत पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करत आहेत. तसेच विविध प्रकल्प साकारण्यासाठी ते पावले उचलत असून तेही उद्याच्या परिषदेत विशेष घोषणा करण्याची शक्यता आहे.

पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास आणि नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या हेतूने तिसरी ही पर्यटन परिषद आयोजित केली आहे. परिषदेत हेरिटेज टुरिझम हा महत्त्वाचा पैलू हाताळण्यात येणार आहे. दुसर्यात सत्रात शाश्वात पर्यटन क्षमता व आव्हाने या विषयावर चर्चासत्र होईल. परिषदेत सुधीर रिसबूड, प्रा. सौ. मीनल ओक, श्रीवल्लभ साठे, ऋत्विज आपटे, उदय बने, डॉ. चंद्रशेखर निमकर या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

परिषदेला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, रायगडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब दराडे, वीणा वर्ल्डचे संचालक सुधीर पाटील, टुरिझम कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मुख्य संघटक डॉ. संतोष कामेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, लवकरच होणारी प्रवासी विमान वाहतूक यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे, यातून जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि तरुणांना रोजगारही मिळू शकतो. याकरिता ही परिषद आयोजित केली आहे. यासाठी या परिषदेत जास्तीत जास्त शेतकरी, आंबा बागायतदार, तरुण बेरोजगार, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी, समुद्रकिनारी जमीन असणारे शेतकरी, पडीक जमिनींचे मालक, पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे. परिषदेला इन्फिगो आय केअर, निसर्गयात्री संस्था आणि मैत्री ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले आहे.

नोंदणीसाठी….

परिषदेत सहभागी होण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याची नोंदणी परिषदेच्या दिवशी, म्हणजे बुधवारी परिषदेच्याच ठिकाणी होणार आहे. त्यासाठी राजू भाटलेकर (९१३०३८३६६६), सुहास ठाकूरदेसाई (९८२२२९०८५९) किंवा सुधीर रिसबूड (९४२२३७२०२०) यांच्याशी संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply