रत्नागिरीत २३, सिंधुदुर्गात करोनाचे नवे ६ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३ मार्च) करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार २७ झाली आहे. आज २६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ६ बाधित आढळले, तर ४ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि दापोलीत प्रत्येकी १, खेडमध्ये ५, तर चिपळूण आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी ४ (एकूण १५) रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी १, खेडमध्ये ३, तर संगमेश्वरमध्ये २ (एकूण ८) रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून २३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार २७ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५७२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८१ हजार ६८९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२६ आहे. त्यातील सर्वाधिक ४४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९५०४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.७८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६७ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (३ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ६ करोनाबाधित आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४६० झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६१२८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

राणेंच्या रुग्णालयात मोफत लसीकरण

पडवे (ता. कुडाळ) येथील नारायण राणेंच्या एसएसपीएम रुग्णालयात करोनाप्रतिबंधक लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. श्री. राणे यांच्या हस्ते आज या मोहिमेचा प्रारंभ झाला. करोना नियंत्रणासाठी देशात ठिकठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. शासकीय ठिकाणी हे लसीकरण मोफत होणार असून खासगी रुग्णालयात २५० रुपये भरून लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र खासदार नारायण राणे संचालित पडवे येथील एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये अन्यत्र २५० रुपयांना मिळणारी करोनाची लस पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या लसीकरणाचा खर्च श्री. राणे स्वतः उचलणार आहेत. हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply