कोकण इतिहास परिषदेचे अकरावे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी

कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे ऑनलाइन राष्ट्रीय अधिवेशन येत्या रविवारी (दि. २४ ऑक्टोबर) येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयात होणार आहे. कल्याण येथे पत्रकार परिषदेत ही माहिती आज देण्यात आली.

पालघरपासून गोव्यापर्यंत पसरलेल्या कोकणात इतिहास संवर्धन आणि संशोधनाचे कार्य कोकण इतिहास परिषद करीत आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम परिषद आयोजित करते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजित केली जाते. यावर्षीचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या रविवारी सकाळी ९.३० ते सायं ५ वाजेपर्यंत कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात होणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन ठाण्याचेच जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. वर्षा शिरगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पहिल्या सत्रात कोकण इतिहास परिषद कोकणचा इतिहास व पुरातत्व विषयात महत्त्वाचे संशोधन कार्य करणारे ज्येष्ठ संशोधक, मंदिर स्थापत्य आणि कला या विषयात संशोधन केलेल्या प्राच्यविद्या विभूषित डॉ. कुमिदिनी कानिटकर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. दुसऱ्या विभागीय सत्रात सकाळी ११ पासून प्राचीन विभाग(डॉ. अनुराधा रानडे), मध्ययुगीन विभाग (डॉ. मोहसीना मुकादम), आधुनिक विभाग (डॉ. मेहेरज्योती सांगळे) याविषयी मार्गदर्शन होईल. या ऑनलाइन परिषदेत कोकणच्या प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सागरी, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक इतिहासावर आधारित विषयावर तसेच करोना या समकालीन विषयावर मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत प्राध्यापक, इतिहास अभ्यासक तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी शोधनिबंध सादर करतील.

दरवर्षी कोकणच्या इतिहासावर आधारित संशोधन ग्रंथाला पुरस्काराने गौरविण्यात येते. परिषदेत सादर होणाऱ्या शोधपत्रिकेत उत्कृष्ट शोधनिबंध लिहिणाऱ्या संशोधकाला पुरस्कार देण्यात येतो. शिवाय शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन, कोकण इतिहास पत्रिकेचे प्रकाशन आणि मान्यवर इतिहास लेखकांचे पुस्तक प्रकाशन केले जाते. ते कार्यक्रम होणार आहेत.

परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, कोकण इतिहास परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास वेदक, स्थानिक संयोजक आणि इतिहास विभागप्रमुख डॉ. स्वप्ना समेळ, परिषदेच्या सचिव डॉ. विद्या प्रभू, परिषद समन्वयक प्रा. जितेंद्र भामरे यांनी केले आहे. परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. विद्या प्रभू (९८२०२७७७३७) आणि प्रा. जितेंद्र भामरे (९६१९७०१७२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply